कोतोलीत लोकप्रतिनिधीकडून पोलीस हवालदाराचा समाचार;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:24+5:302021-09-04T04:30:24+5:30
पन्हाळा पश्चिम भागात अवैध धंदयांना ऊत : चार दारू दुकानदारांवर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क विक्रम पाटील : करंजफेण कासारी ...
पन्हाळा पश्चिम भागात अवैध धंदयांना ऊत : चार दारू दुकानदारांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रम पाटील : करंजफेण
कासारी नदीच्या जलसंपदेमुळे सुजलाम-सुफलाम झालेल्या पश्चिम पन्हाळा परिसरात पोलीस खात्याच्या अशीर्वादामुळे अवैध धंद्यांना ऊत आला असून, युवा वर्ग व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने पालकांतून चिंता व्यक्त होत आहे. कोतोली बीटमध्ये खाकी वर्दीतील प्रकाशमय असल्याचा आव आणणाऱ्या एका पोलीस हवालदाराने चिरमिरीच्या कारणास्तव युवकाला गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत असताना, एका लोकप्रतिनिधीने याचा चांगलाच समाचार घेऊन धारेवर धरल्यामुळे परिसरात या विषयाची चांगलीच चर्चा रंगलीय. त्यामुळे पन्हाळा पोलीस ठाण्यात नवीन रूजू झालेले पोलीस अधिकारी या बाबीची वेळीच दखल घेऊन हप्तेगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची वेळीच झाडाझडती घेणार का? असा प्रश्न जनमाणसातून उपस्थित होत आहे.
पन्हाळा पश्चिम परिसरात दारू, जुगारापासून थेट गांजा विक्रीचे कनेक्शन असल्याची दबक्या आवाजात अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा असतानादेखील हवालदाराच्या प्रकाशात आलेल्या कारनाम्यामुळे चिरीमिरीची चर्चा थेट चव्हाट्यावर आली आहे. परिसरात हप्तेगिरीवर सध्या अवैध धंदे जोमाने वाढू लागले असून, बेकायदेशीर दारू विक्रीचे जागोजागी अड्डे बनू लागले आहेत. कारवाईचा दिखावा म्हणून पोलिसांनी चार दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत; मात्र अनेक खुलेआम अवैध धंदे करणारे मात्र मोकाट असल्याने याचे गौडबंगाल काय? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावोगावी प्रबोधनाचे धडे दिले जात असताना, अचानक दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यातून परिसरात घडणाऱ्या सर्वच अवैध धंदयांना खरोखर चाप बसविण्यात नूतन पोलीस अधिकारी यशस्वी प्रयत्न करणार का?, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
चौकट
हप्तेगिरीचे कनेक्शन थेट कोल्हापूरपर्यंत
अवैध धंदे करणाऱ्यांमागे पाच-सहा वेगवेगळे पंटर महिन्याकाठी हप्ता वसुलीसाठी हजर होत असून, हप्त्याचा वायदा चुकल्यास मात्र थेट कारवाईचा बडगा उगारून गुन्ह्यात ओवले जात असल्याने हप्ते मागणाऱ्यांमध्ये कोल्हापूरपासून थेट कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अवैध धंदेवालेदेखील हप्तेगिरीमुळे मेटाकुटीला आले आहेत.