शिक्षेच्या वृत्ताने आनेवाडी सुन्न
By admin | Published: April 11, 2017 12:23 AM2017-04-11T00:23:59+5:302017-04-11T00:23:59+5:30
आनेवाडी, ता. जावळी येथील याच घरात निवृत्त कमांडर कुलभूषण जाधव राहत होते.
सायगाव : जावळी तालुक्यातील आनेवाडी येथील रहिवासी व नौदलातील निवृत्त कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानच्या या निर्णयाचे वृत्त सातारा जिल्ह्यात येऊन धडकताच आनेवाडी ग्रामस्थ सुन्न झाले. कुलभूषण जाधव हे पाच ते सहा वर्षांपासून आनेवाडीत शेती खरेदी करून येथील शेतात घर बांधून कुटुंबीयासमवेत राहत होते. जाधव हे निवृत्तीनंतरही सामाजिक कामाने अल्पावधीत लोक परिचित होते.
कुलभूषण जाधव हे अनेक गावांमधील प्राथमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, त्यांच्यात रमून सेनेतील पराक्रमाच्या गोष्टी सांगून देशसेवेचे बिजे रुजवत असत. प्रत्येक कामात हिरीरीने भाग घेणारे कुलभूषण जाधव यांना दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान सरकारने पकडले. पाकिस्तानने हेरगिरी केल्याचा ठपका ठेवून फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे परिसरातील लोकांना देशसेवेचे धडे देणारे जाधव असे काही करतील, असे वाटत नाही. मूळात पाकिस्तानी सरकार खोटे आरोप करून त्यांना या प्रकरणात अडकवू पाहत आहे, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.