दुसऱ्या दिवशी ४१८ ज्येष्ठांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:50+5:302021-03-04T04:43:50+5:30
कोल्हापूर : लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ४१८ ज्येष्ठांनी कोरोना लसीकरण करून घेतले. ग्रामीण भागातील २०३ तर शहरातील २१५ ...
कोल्हापूर : लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ४१८ ज्येष्ठांनी कोरोना लसीकरण करून घेतले. ग्रामीण भागातील २०३ तर शहरातील २१५ जणांचा समावेश आहे.
सोमवारपासून देशभरात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. ग्रामीण भागातील १९ केंद्र, तर शहरात ११ अशा एकूण ३० केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. शासकीय आदेश, केंद्राची निवड आणि प्रशिक्षण यांचे प्रशासकीय पातळीवर अद्याप नियोजन सुरू असल्याने अत्यंत धिम्या गतीने लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात हे ज्येष्ठांचे लसीकरणही केले जात आहे.
मंगळवारी गगनबावडा व पन्हाळा हे दोन तालुके वगळता अन्य दहा तालुक्यांत लसीकरण झाले. यात ४१८ ज्येष्ठामध्ये २५८ पुरुष, तर १६० महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागातून आजऱ्यात ११, भूदरगडमध्ये ४, चंदगडमध्ये ५२, गडहिग्लजमध्ये ५, हातकणंगलेमध्ये २६, करवीरमध्ये २०, कागलमध्ये १४, राधानगरीत ३, शाहूवाडीत ३, शिरोळमध्ये ६५ जणांनी लस टोचून घेतली. कोल्हापूर शहरातील ११ केंद्रावर २१५ जणांनी लस घेतली.
फोटो: ०२०३२०२१-कोल-लसीकरण ०१
फोटो ओळ :
आम्ही झालो पुढे..तुम्ही अजून मागेच व्हय...
कोल्हापुरात मंगळवारी ग्रामीण भागातील साठ वर्षांवरील महिलेने लस टोचून घेतली व इतरांना लस घेण्याचा जणू संदेशच दिला. (छाया: नसीर अत्तार )