जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अवकाळीचा दणका
By Admin | Published: February 29, 2016 01:14 AM2016-02-29T01:14:21+5:302016-02-29T01:14:43+5:30
आटपाडीत गारपीट : जतला वादळी वाऱ्याने नुकसान; कवठेमहांकाळातही वादळी पाऊस
सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांतील काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे शेतीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ऐन बहरात असलेल्या बेदाणा हंगामाला याचा मोठा फटका बसणार आहे. हवामान खात्याने अजून दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचे वर्तवल्याने बेदाणा व भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
शनिवारी जिल्ह्याच्या पूर्व भागात विशेषत: दुष्काळी पट्ट्यात पावसाने हजेरी लावली होती. पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या आटपाडीकरांना पावसाच्या सरींनी दिलासा दिला. रविवारी सायंकाळी जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तब्बल साडेचार महिन्यांनी पावसाने तोंड दाखविले; पण पावसापेक्षा जोरदार वाऱ्याने अनेक दुकानांचे फलक, शेतातील कडबा, कडब्याच्या गंजीवरील पत्रे उडून गेले.
आटपाडी परिसरात शिडकावा
आटपाडी : आटपाडीसह दिघंची, विठलापूर, खरसुंडी, करगणी, शेटफळे, हिवतड परिसरात पावसाने शिडकावा केला. दिघंची आणि खरसुंडी येथे रविवारी आठवडा बाजार भरतो. दोन्हीही गावांत सायंकाळीच बाजारात गर्दी होते. नेमक्या याचवेळी वादळी वारे आणि पावसाचे आगमन झाल्यामुळे बाजारातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. अजून गंजी न लावलेल्या शेतकऱ्यांच्या कडब्याचेही नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वारे व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शाळू, हरभरा, हळद काढणी व हळद शिजवून शेतात वाळवण्यासाठी टाकण्यात आली आहे. तसेच द्राक्षबागांचा हंगाम सुरू असल्याने व बेदाणा तयार करण्यासाठी बागायतदारांची धावपळ सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजून दोन दिवस वादळी पावसाची शक्यता
सलग दोन दिवस होत असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असतानाच, हवामान खात्याने अजून दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २ व ३ मार्चलाही ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने बेदाणा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे.