राज्यात येत्या शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ मोहिम, आबालवृद्धांची होणार आरोग्य तपासणी

By समीर देशपांडे | Published: August 30, 2023 01:21 PM2023-08-30T13:21:06+5:302023-08-30T13:29:28+5:30

आरोग्य विभागात बैठकांचा धडका

Next Friday Ayushman Bhav health campaign in the state from September 1 to December 31 | राज्यात येत्या शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ मोहिम, आबालवृद्धांची होणार आरोग्य तपासणी

राज्यात येत्या शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ मोहिम, आबालवृद्धांची होणार आरोग्य तपासणी

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार येत्या शुक्रवार, दि. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यात ‘आयुष्मान भव’ ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हापातळीवर बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आबालवृद्धांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.

‘आयुष्मान आपल्या दारी ३.०’ या उपक्रमामध्ये सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात येणार आहे. ‘आयुष्मान सभा’ उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहेत. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांबाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जागृती करण्यात येणार आहे.

‘आयुष्मान मेळावा’अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा यांबाबत चार आठवड्यांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या पातळीवर वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून आठवड्याला एक आरोग्य मेळावा घेण्यात येईल.

अंगणवाडी, प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी

याच दरम्यान सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मुलांची ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्य देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व वयोगटांतील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ही ‘आयुष्मान भव’ मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असून, राज्यभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. - डॉ. प्रेमचंद कांबळे, उपसंचालक, आरोग्य विभाग, कोल्हापूर

Web Title: Next Friday Ayushman Bhav health campaign in the state from September 1 to December 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.