पुढचा खासदार मंडलिकांच्या विचारांचाच : संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:14 PM2018-11-07T23:14:29+5:302018-11-07T23:15:14+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. ...
म्हाकवे : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. त्यामुळे आगामी खासदार हा मंडलिक गटाचा आणि त्यांच्या विचारांचाच होईल यामध्ये तीळमात्र शंका नाही, असा आत्मविश्वास जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्यावतीने कार्यस्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व संचालकांसह सभासद शेतकरी, ऊसतोड, मजूर व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे दिवाळीनिमित्त स्नेहफराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडलिकांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, वीरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपसभापती विजय भोसले, विश्वासराव कुराडे, आनंदा मोरे, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, नंदकुमार घोरपडे, समरजित मंडलिक, आदी उपस्थित होते.
दि. १४ रोजी गारगोटीत पुरस्कार वितरण
दिवंगत सदाशिवराव मंडलिक ही सामान्य व्यक्ती नसून ती अखंडित विचारधाराच आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी त्यांच्या नावे स्मृती पुरस्कार विविध क्षेत्रांतील ख्यातनाम विभूतींचा सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी (ता.भुदरगड) येथे बुधवारी (दि.१४) होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही प्रा.मंडलिक यांनी केले.
...आता सभासद शेतकºयांनीच पुढाकार घ्यावा
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यात साखर कारखान्याचे मोलाचे योगदान आहे. मात्र, सद्य:स्थितीत कारखानदारीच अडचणीत आहे. संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहे तर शासन तोडग्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. ऊसतोडीसाठी आलेले मजूर व कारखान्याचे कर्मचारी बसून आहेत. त्यांची खोटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अशा वादात कारखानदारी मोडणार नाही याची दक्षता आता आपणच घेणे आवश्यक असल्याचे सांगत प्रा.मंडलिक यांनी थेट सभासदांनाच साद घातली.