पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:15+5:302021-07-27T04:24:15+5:30
कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांना विविध संघटना आणि सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात या पूरग्रस्तांना ...
कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांना विविध संघटना आणि सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात या पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात येत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर वैद्यकीय शिबिरे आणि स्वच्छतेचे काम करण्याचे या संस्थांनी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासनाचा भार हलका होण्यास मदत झाली. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपने (केडीएमजी) आपत्कालीन मदतकार्य सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात सेंट्रल किचनद्वारे रोज तीन हजार पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात येत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर वैद्यकीय शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्ट आणि अयोध्या फाउंडेशनने सेंट्रल किचन सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून रोज अडीच हजार नागरिकांना नाष्टा, तर एक हजार जणांना दोन वेळचे जेवण पुरविण्यात येत आहे. मराठा ऑर्गनायझेशन आणि मनविसे यांच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महापुरामुळे थांबून असलेले परराज्यातील प्रवासी आणि एसटीचे कर्मचारी यांना रविवारी जेवण पुरविण्यात आले. पुढील तीन दिवस जेवण पुरविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मराठा ऑर्गनायझेशनचे ऋतुराज पाटील, अभिजित राऊत यांनी सांगितले. यावेळी आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे डॉ. प्रवीण कोडोलीकर, विश्वजित वाडकर, मंदार पाटील, उत्तम वंदुरे, रोहित कस्तुरे उपस्थित होते. बैतुलमाल कमिटीने रविवारपासून खाटीक चौकामध्ये सेंट्रल किचन सुरू केले. त्याद्वारे रोज पाचशे पूरग्रस्तांना जेवण पुरविण्यात येणार असल्याचे तौफिक मुलाणी यांनी सांगितले. पाण्यामध्ये अडकलेल्या रत्नागिरी- विजयपूर या बसमधील २५ प्रवासी आणि सुतारवाडा, आदी परिसरातील पूरबाधितांसाठी मुस्लीम बोर्डिंगने निवारा केंद्र सुरू केले आहे. सेवा निलयम संस्थांकडून रोज दोनशे जणांना चहा-नाष्टा आणि जेवण पुरविण्यात येत असल्याचे ऐश्वर्या मुनिश्वर यांनी सांगितले. कोल्हापूर रेस्क्यू टीमने (केआरएफ) ‘एनडीआरएफ’च्या जवानांसमवेत शिवाजी पूल, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे या भागांत आपत्कालीन मोहीम राबविली आहे. त्यांनी सुमारे सातशे जणांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
चौकट
‘व्हाइट आर्मी’कडून मदतकार्य
व्हाइट आर्मी संस्थेच्या वतीने चिखली, आंबेवाडी, प्रयाग चिखली, शिरोळसह चिपळूणमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू आहे. त्यासाठी ५० जणांचे पथक कार्यरत असल्याचे व्हाइट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांगितले.
चौकट
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे आप्तकालीन मदत
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेने बुधवारपासून पूरग्रस्तांसाठी हेल्पलाइन सुरू केली. या सोसायटीच्या स्वयंसेवकांनी न्यू पॅलेस परिसरातील २२० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. रुग्णांना देखील सुखरूपपणे बाहेर काढले. काही अपार्टमेंटना जनरेटरसाठी डिझेल पुरविले. सर्पमित्रांच्या माध्यमातून साप पकडले असल्याचे अमरदीप पाटील यांनी सांगितले.