'एनआयए'ची छापेमारी, कोल्हापुरात जवाहरनगरमधील एकास घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:32 PM2022-09-22T12:32:39+5:302022-09-22T13:14:15+5:30
काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते.
कोल्हापूर: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात छापेमारी केली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याच्या आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. कोल्हापुरातही जवाहरनगर परिसरात छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सिरात मोहल्ला, सुभाषनगर परिसरातील हा संशयित आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. एनआयएने या कारवाईबाबत गुप्तता पाळली आहे.
संशयितासह त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या घटनेची माहिती जवाहरनगर परिसरात पसरताच नागरिकांनी छापा पडलेल्या घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याकारवाईबाबत मात्र स्थानिक पोलीसांना कोणतीही माहिती नव्हती. काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते.
१०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक
गेल्या काही दिवसांत एनआयएने या प्रकरणात एक डझनाहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पीएफआयशी संबंधित धागेदोरे सापडले होते. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी पीएफआयशी संबंधित १०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचा प्रमुख परवेझ अहमद याच्याही एनआयएने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत.