तीन महिन्यांत नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार : संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:06 PM2020-02-21T14:06:35+5:302020-02-21T14:08:46+5:30
टर्मिनल बिल्ंिडग, एटीसी टॉवर, अतिरिक्त भूसंपादन, आदी स्वरूपातील विमानतळाबाबतची कामे प्रगतिपथावर आहेत. विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा तीन महिन्यांत उपलब्ध होईल. त्यादृृष्टीने विमानतळ प्राधिकरणाचे काम सुरू आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर : टर्मिनल बिल्ंिडग, एटीसी टॉवर, अतिरिक्त भूसंपादन, आदी स्वरूपातील विमानतळाबाबतची कामे प्रगतिपथावर आहेत. विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा तीन महिन्यांत उपलब्ध होईल. त्यादृृष्टीने विमानतळ प्राधिकरणाचे काम सुरू आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विमानतळावर झालेल्या बैठकीस खासदार धैर्यशील माने, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर प्रमुख उपस्थित होते.
दर्जेदार सेवा आणि विकासाच्या दिशेने विमानतळाची वाटचाल सुरू आहे. नाईट लँडिंगसह कार्गोची सेवा उपलब्ध करून देण्यातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या बैठकीत विमानतळ विस्तारीकरण, विकासाचे सुरू असणारे काम, त्यातील अडचणी, विविध प्रश्न, भविष्यातील कामे जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. विमानतळ सुसज्ज असणे कोल्हापूरची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासह कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही काम करणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाला शोभेल असे विमानतळ करण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी संचालक कटारिया यांनी विमानतळावर सुरू असणारी विकास कामे, भविष्यातील नियोजित कामे, तसेच अडचणींची माहिती दिली. यावेळी समिती सदस्य व्ही. बी. पाटील, विज्ञान मुंडे, तेज घाटगे, अमर गांधी, विक्रांतसिंह कदम, विजय घाडगे, अमित हुक्केरीकर, विशाल भार्गव, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर समिती सदस्यांनी विमानतळ परिसरात सुरू असणाऱ्या कामांची पाहणी केली.
पाच कोटींची फायर फायटिंग व्हॅन दाखल
या विमानतळावर पाच कोटी २१ लाख रुपयांची फायर फायटिंग व्हॅन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून दाखल झाली आहे. आॅस्ट्रिया येथे तयार झालेली ही व्हॅन अद्ययावत आहे. ही व्हॅन धावताना त्यातून फायर फायटिंग करता येते. त्यात पाणी, फोम आणि ड्राय केमिकल पावडरचा वापर करता येतो. सध्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबदेखील विमानतळावर उपलब्ध आहे,असे प्राधिकरणाचे संचालक कटारिया यांनी सांगितले.