निगवे दुमालात सराफ दुकान फोडले, दागिन्यांची तिजोरी लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:17 PM2019-01-16T18:17:03+5:302019-01-16T18:19:06+5:30
निगवे दुमाला (ता. करवीर) येथे सराफ दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरीच लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. तिजोरीत तीन किलो चांदीचे व किरकोळ सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख किमतीचा ऐवज होता. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे सराफ दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरीच लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. तिजोरीत तीन किलो चांदीचे व किरकोळ सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख किमतीचा ऐवज होता. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
अधिक माहिती अशी, अजित भगवान सडोलीकर (वय ४०, रा. दिंडे मळा, वडणगे, ता. करवीर) यांचे मेन रोड निगवे दुमाला येथे साई ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. बुधवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी सडोलीकर यांना फोन करून चोरीची माहिती दिली. त्यांनी दुकानाकडे धाव घेत पाहणी केली असता, तिजोरी लंपास असल्याचे दिसून आले. त्यांनी करवीर पोलिसांना वर्दी दिली.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कॅमेराबद्ध झाले आहेत. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोतून चोरटे आले आहेत. त्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.
तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, ती उघडत नसल्याने १00 ते १५0 किलोची लहान तिजोरी उचलून टेम्पोत घालून, लंपास केल्याचे दिसून आले आहे. टेम्पोच्या नंबरवरून चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
सहा महिन्यांत दुसरी चोरी
सहा महिन्यांपूर्वी वडणगे, निगवे परिसरात पाच ठिकाणी घरफोडी झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रकार घडला. वडणगे, निगवे दुमाला, भुये, भुयेवाडी या भागांत पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.