इच्छुकांच्या मनधरणीसाठी निकराचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:44+5:302021-04-19T04:22:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या माेठ्या प्रमाणात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या माेठ्या प्रमाणात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक उडत आहे. रविवारी दिवसभर नेत्यांनी पॅनलमधील नावांवर अंतिम हात फिरवला असून आज, सोमवारी उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यामुळे माघारीसाठी आज, निवडणूक कार्यालयात अक्षरश: झुंबड उडणार आहे.
‘गोकूळ’च्या २१ जागांसाठी ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले. ६ एप्रिलपासून माघारीस सुरुवात झाली असली तरी केवळ बारा जणांनी माघार घेतली आहे. माघारीसाठी दोनच दिवस राहिले आहेत आणि ३७८ अर्ज शिल्लक आहेत. यावरून पॅनलमधील इच्छुकांचा दबाव लक्षात येतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपले नाव रेटण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू असल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
रविवारी दिवसभर पॅनलला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. सत्तारूढ गटाकडून आ. पी. एन. पाटील, माजी आ. महादेवराव महाडीक यांच्या चर्चा होती. तर विरोधी आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांमध्ये खलबते सुरू होते. आज, सोमवारी पॅनलमधील नावावर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. मात्र, ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना नेत्यांनी माघार घेण्याची सूचना दिल्याने गर्दी होणार आहे.
निवडणुकीचा आज फैसला
कोराेनाच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होत आहे. कोरोना संसर्गाने शाहूवाडीतील एका ठरावधारकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे न्यायालयन निवडणुकीबाबत काय भूमिका घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष आहे.
अवैध ठरवलेल्या अर्जांचा आज निकाल
‘गोकूळ’च्या छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेल्या पंधरा जणांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे अपील केले होते. संबधितांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्याचा निकाल आज दिला जाणार आहे.