कोल्हापूरचा निखिल भारतीय फुटबॉल संघात
By Admin | Published: March 24, 2015 12:45 AM2015-03-24T00:45:41+5:302015-03-25T00:48:32+5:30
अंडर-२३ : एएफसी पात्रता स्पर्धेसाठी ढाक्यात खेळणार
कोल्हापूर : कोल्हापूरचा सुपुत्र व सध्या पुणे एफसी फुटबॉल संघाकडून खेळणाऱ्या निखिल कदमची २३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. गोवा येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. अशी निवड होणारा निखिल हा कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू आहे. ढाका येथे २३ वर्षांखालील एएफसी चॅम्पियनशीप पात्रता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निखिल ढाक्यात खेळणार आहे.
निखिलचे सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण व फुटबॉलचे धडे गिरविण्यासाठी वडिलांनी त्याला पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. पुणे येथे फुटबॉलचे धडे घेताना त्याची निवड नामांकित पुणे एफसी संघाच्या १९ वर्षांखालील संघात २०११ ला झाली. त्याने १९ वर्षांखालील संघातून पुणे एफसी संघाचे दोन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याची २०१३ मध्ये आयलीग स्पर्धेसाठी पुणे एफसीच्या वरिष्ठ संघात निवड करण्यात आली. पुणे एफसी संघाकडून खेळताना त्याने २८ नामांकित संघांविरुद्ध खेळ केला आहे. त्याने यंदाच्या हंगामात महत्त्वपूर्ण दोन गोल केले आहेत. त्याच्या कामगिरीची दखल घेत भारतीय फुटबॉल फेडरेशनने त्याची ३२ जणांच्या २३ वर्षांखालील भारतीय संघात त्याची निवड केली होती. या संघाचे निवड शिबिर गोवा व गुवाहाटी येथे सुरू होते. यातून त्याची २३ जणांच्या अंतिम संघात निवड करण्यात आली. या संघात निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. त्याला मालोजीराजे छत्रपती, विकास पाटील, किशोर पाटील, किरण साळोखे, राजू कदम यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
घरातूनच फुटबॉलचे बाळकडू
निखिलचे आजोबा कै. राम कदम हे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे गोलकिपर होते, तर चुलत आजोबा शंकरराव, मुरलीधर आणि पांडुरंग कदम हेसुद्धा प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे माजी खेळाडू होते. निखिलचे वडील एस. टी. महामंडळाचे खेळाडू, तर चुलते शिवाजी तरुण मंडळ, कोल्हापूर, सांगली पोलीस संघाचे फुटबॉल खेळाडू होते. त्यामुळे फुटबॉलचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले आहे.
ढाका येथे होणार स्पर्धा
एएफसी चॅम्पियनशीप २0१६ या स्पर्धेसाठी ढाका येथे पात्रता स्पर्धा होणार आहे. यात निखिल भारताकडून खेळेल. भारताचा पहिला सामना शुक्रवारी (दि. २७) उझबेकिस्तानबरोबर होणार आहे. त्यानंतर २९ मार्चला सिरिया या देशाविरुद्ध, तर ३१ मार्चला बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे.
५निखिलच्या आईचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले. या दु:खातून सावरत त्याने या पात्रता फेरीत घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले. गेल्या आठ वर्षांपासून तो पुणे येथे फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या निवडीने कोल्हापूरचे नाव भारतीय फुटबॉल जगतात उज्ज्वल झाले आहे.
- सुरेश कदम,
निखिलचे वडील