आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:52 PM2022-07-20T12:52:24+5:302022-07-20T12:53:13+5:30
अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या सुनिल रावसाहेब कमलाकर यांच्या लेकीचे दैदीप्यमान यश
गणपती कोळी
कुरुंदवाड : अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुनिल रावसाहेब कमलाकर यांची मुलगी निकिता सुनिल कमलाकर हीने आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. उझबेकिस्तान येथील ताश्कंद शहरात या स्पर्धा सुरू आहेत. तीच्या या यशामुळे शहराचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार झाले आहे. निकिताला पदक मिळाल्याचे समजताच आई वडीलांसह आजोबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू मावत नव्हते.
उझबेकिस्तान येथील ताश्कंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये 55 किलो वजनी गटात निकिताने 68 किलो स्नँक आणि 95 किलो क्लीन अँन्ड जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. तर क्लीन अँन्ड जर्क मध्ये सुवर्णपदक पटकावले.
निकिताने एक महिन्यापूर्वी मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड च़म्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते मात्र तिचे पदक हुकले होते. तीला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, प्रशिक्षक विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.
घरची परिस्थिती प्रतिकुल
सुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग आहेत. घरची शेती नाही त्यामुळे घरचा चरितार्थ चालविण्यासाठी सुनिल आणि त्यांचे वडील रावसाहेब शहरातील दर्गा चौकात चहाचा गाडा चालवतात. या गाड्यावर वडील थांबतात तर सुनिल शहरात फिरुन चहा विकतो. तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च यावर भागत नसल्याने निकिताची आई दत्त साखर कारखाण्यातील दवाखान्यात सेविका (नर्स) म्हणून काम करते.
निकिता दत्त महाविद्यालयात बारावी वर्गात शिकत आहे. तिला वेटलिप्टिंगची आवड असल्याने शहरातील वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय माळी यांच्या विश्वविजय जीममध्ये वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे.
निकिता आशियाई स्पर्धेत पदक मिळविल्याने आमच्या कष्टाचे चीज झाले. तीच्या कोणत्याही आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी तीला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी आम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची आमची तयारी आहे. - सुनिल कमलाकर, तेरवाड - निकिताचे वडील