महापौरपदासाठी काँग्रेसकडून नीलोफर आजरेकर, ताराराणीकडून अर्चना पागर यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 05:05 PM2020-02-06T17:05:07+5:302020-02-06T17:06:46+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे.
कोल्हापूर : महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे.
महापौरपदाचे उमेदवार कोण असणार, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याबाबत उत्कंठा लागून राहिली होती, मात्र दुपारी चारनंतर काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
असे असले तरी महानगरपालिकेतील सत्ताबळ पाहता काँग्रेस आघाडीच्या निलोफर आजरेकर याच नव्या महापौरपद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे नऊ महिन्यांचा कार्यकाल असणार आहे.
राष्ट्रवादीच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौरपदाच्या निवडणुका होत आहे, यामुळे महापालिकेतील राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. विरोधी आघाडीपेक्षा ही चुरस सत्तारूढ कॉँग्रेस पक्षातच अधिक होती.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची मते अजमावून घेतली होती. तरीही त्यातून निर्णयापर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बुधवारी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली.
पालकमंत्री पाटील यांनी निलोफर आजरेकर, उमा बनछोडे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण या चौघा इच्छुकांबरोबर चर्चा केली. यावेळी इंदुमती माने व राहुल माने हे बाहेरगावी गेल्यामुळे मुलाखतीवेळी अनुपस्थित होते. गुरुवारी गटनेते शारंगधर देशमुख यांच्याकडे निलोफर आजरेकर यांचे नाव महापौरपदासाठी देण्यात आले.
दरम्यान, विरोधी भाजप ताराराणी आघाडीनेही बुधवारी बैठक घेतली. विरोधी पक्षपेते विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर या तिघांनी बसून चर्चा केली. महापौरपदाची निवडणूक ताराराणी आघाडीने, तर स्थायी सभापतिपदाची निवडणूक भाजपने लढवावी, असे यावेळी ठरले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना माहिती देण्यात आली. गुरुवारी दुपारी ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.