काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर महापौरपदी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:36 AM2020-02-10T11:36:24+5:302020-02-10T11:41:24+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत.
कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत.
विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने रविवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार कमलाकर भोपळे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे आजरेकर यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच उरली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता झालेल्या सभेत त्यांची महापौरपदी निवड झाली. ४८ विरुध्द १ अशा मतांनी आजरेकर यांची निवड झाली.
राष्ट्रवादीच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी महापालिकेने निवडणूक प्रक्रिया राबविली. काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीकडून या पदासाठी कॉँग्रेसच्या निलोफर आश्किन आजरेकर आणि ताराराणी आघाडीच्या अर्चना उमेश पागर यांनी अर्ज केले होते. आज, सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीने निवडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रविवारी रात्री घेतला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या चार वर्षांमध्ये महापालिकेतील सर्वोच्च अशा महापौरपदाची खांडोळी केल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. यामुळे महापौर निवडीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी सांगितले. प्रत्यक्षात कमलाकर भोपळे यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेउन विरोधात मतदान केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्य सहलीवरून परतले
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य पन्हाळा येथे सहलीवर गेले होते. २८ पेक्षा जास्त सदस्य दोन दिवसांपासून तेथे होते. आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात ते आरामबसने आले, त्यानंतर आमदार चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदी नेत्यांसमवेत फेटे घालूनच ते सभागृहात दाखल झाले.
पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आवारात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.