निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलाचे कठडे तुटले
By Admin | Published: May 14, 2017 10:42 PM2017-05-14T22:42:02+5:302017-05-14T22:42:02+5:30
वाहतुकीला धोका : नेहमी वर्दळ असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
दिलीप चरणे । --लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने धोकादायक बनला आहे. हा पूल दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने दुरुस्तीची जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. पुलावरील संरक्षक ग्रील दुरुस्तीसाठी बारा वर्षे वाट पहाणाऱ्या
नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द पुलावरील मार्ग वारणानगर-कोडोली व निलेवाडीहून पारगावला जाणारा जवळचा आहे. वारणा कारखाना, दूध संघाकडे जाणारे कर्मचारी, विद्यार्थी व वारणा-कोडोलीकडे व पारगाव मार्गे पुढे वाठार, वडगाव, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांना हा मार्ग सोयिस्कर आहे.
पुलावरून वाहतुकीची अशा धोकादायक स्थितीतही रात्रंदिवस सतत वर्दळ चालू आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा पूल महापुराने ७-८ दिवस पाण्याखाली जात असतो. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचे संरक्षक कठडे, याशिवाय दोन्ही बाजूच्या संरक्षक पाईप्स तुटून गेल्याने
हा पूल धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने याकडे
गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. २००५ मध्ये वारणा नदीला महापूर आला होता. यावेळच्या महापुराने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक पाईप वाहून गेल्या, तर काही गायब झाल्या होत्या. पूल कठडा ग्रील दुरुस्तीसाठी निलेवाडी व ऐतवडे खुर्दच्या ग्रामस्थांनी वारंवार अर्ज-विनंत्या केल्या. ग्रामसभेत ठरावही झाले. तथापि दोन्ही जिल्ह्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.
संरक्षक कठड्यांअभावी पूल वाहतूक व प्रवाशांसाठी धोका बनला आहे. या पुलाजवळ मगरीचा वावर असल्यामुळे पुलावरून कोसळल्यावर मगरीपासून सुटका नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. संबंधितांकडून सदर पुलाची पावसाळ्यापूर्वी योग्य ती दुरुस्ती करून वाहतूकयोग्य करावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांसह, नोकर, विद्यार्थी, वाहनचालक व प्रवाशांतून जोर धरत आहे.
आजअखेर याठिकाणी पुलावरून अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक मोटारसायकल नदीत सापडली आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणखी अशा दुर्दैवी घटना घडण्याची वाट अजून बघणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून या गंभीर विषयावर वारंवार चर्चा झाली आहे.
त्यामुळे संबंधितांकडून त्वरीत दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी या पुलाची योग्य ती दुरुस्ती होऊन हा पुलावरील रस्ता वाहतुकीयोग्य व्हावा, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांतून दिला आहे.
मापे घेतली; कार्यवाही नाही
महाडच्या दुर्दैवी घटनेनंतर काही दिवसांतच संबंधित विभागाकडून या पुलाची मापे घेतली. पुलावरील निकृष्ट रस्ता व संरक्षक कठडे व गायब झालेल्या पाईपची जुजबी माहिती घेतली. पण त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.