निंबाळकर चषक ‘रत्नागिरी’कडे
By admin | Published: May 24, 2015 11:56 PM2015-05-24T23:56:08+5:302015-05-25T00:25:02+5:30
महिला क्रिकेट स्पर्धा : पवार, पसारे यांची चमक
कोल्हापूर : रत्नागिरी जिल्हा महिला संघाने कोल्हापूर जिल्हा महिला संघावर तीन धावांनी मात करीत विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सामन्यात रत्नागिरीच्या दर्शना पवारने उत्कृष्ट फलंदाजी केली; तर कोल्हापूरच्या किशोरी पसारेची ७४ धावांची खेळी व्यर्थ ठरली.
शिवाजी स्टेडियम येथे रविवारी रत्नागिरी जिल्हा महिला संघ व कोल्हापूर जिल्हा महिला संघ यांच्यात अंतिम लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी संघाने ४० षटकांत ४ बाद १९६ धावा केल्या. यामध्ये अनाम मुकादम ६१, दर्शना पवार ७६, तर श्वेता माने हिने नाबाद १७ धावा केल्या.
कोल्हापूर संघाकडून ऋतुजा देशमुख हिने २, तर आदिती गायकवाड हिने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर संघाला हे आव्हान पेलविले नाही. कोल्हापूर संघाने ३७ षटकांत सर्वबाद १९३ धावा केल्या. त्याला केवळ तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. यामध्ये किशोरी पसारे ७४, अनुजा पाटील ३३, तर ऋतुजा देशमुख हिने २२ धावा केल्या. रत्नागिरी संघाकडून श्वेता माने हिने ५, तर भाग्यश्री वासवेने तीन व दीपा ताम्हणकरने दोन बळी घेत कोल्हापूरचा सर्व संघ गारद करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण अमरजा निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘केडीसीए’चे अध्यक्ष बाळ पाटणकर, रमेश कदम, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दीपक मोरे, प्रदीप साळवी, प्रशिक्षक हरीश लांडे, केदार गयावळ, उपाध्यक्ष चेतन चौगुले, मधुकर बामणे, निसा मुजावर, पंच शिवाजी कामते, भरत माने, आदी उपस्थित होते.
विजयी संघ
दर्शना पवार (कर्णधार), श्वेता माने, अनाम मुकादम, दीपा ताम्हणकर, वर्षा सावंत, भाग्यश्री वासवे, वर्षा ढवळे, प्रणाली सावंत, मंजिरी रेवले, सुचेता पवार, अश्विनी पास्ते, विनया जोशी.