पाऊण कोटीच्या नऊ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:24+5:302021-05-15T04:23:24+5:30
(शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोटो वापरावा.) कळे वार्ताहर : गरिबीमुळे मोठ्या खर्चाच्या रखडलेल्या सुमारे पाऊण कोटीच्या नऊ ...
(शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोटो वापरावा.)
कळे वार्ताहर : गरिबीमुळे मोठ्या खर्चाच्या रखडलेल्या सुमारे पाऊण कोटीच्या नऊ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सहकार्यामुळे मोफत झाल्या. अजून अंदाजे दोन कोटींच्या ६३ शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून, त्या कोरोनामुळे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रिया होण्यासाठी सुळे (ता. पन्हाळा) येथील कुंभी धामणी सामाजिक आरोग्य शैक्षणिक संस्थेने पाठपुरावा केला.
स्कोलिओसिस (मेंदू-मज्जारजू-मणका), हृदय शस्त्रक्रिया यासारख्या अनेक रुग्णांच्या मोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या, त्यासाठी कुंभी धामणी सामाजिक संस्थेने खासदार राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी ताबडतोब मुंबई येथील एस आर.सी.सी. हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक २५ मार्चला कोल्हापूरला पाठविले. त्यांनी गगनबावडा तालुक्यातील तिसंगीला आरोग्य शिबिर घेतले. जिल्ह्यातील १३२ रुग्णांची तपासणी झाली. शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांचे सहकार्य मिळाले. ही तपासणी मेंदूविकार शल्यचिकित्सक डॉ. सुमित पवार, अस्थिरोग चिकित्सक डॉ. अवी शाह हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रिया प्रधान, बोन मॅरो ट्रान्स्प्लांट सर्जन डॉ. रुचिता मिश्रा, वाचासंवाद तज्ज्ञ डॉ. शिल्पा हुजूरबाजार या तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली.
कुंभी-धामणी संस्थेचे प्रयत्न
शिबिरामध्ये स्कोलिओसिस (मेंदू-मज्जारजू-मणका) शस्त्रक्रिया ५, हृदय शस्त्रक्रिया ३९, अस्थिरोग शस्त्रक्रिया १२, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया १६ अशा एकूण ७२ शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याचे निष्पन्न झाले. गुंतागुंतीच्या स्कोलिओसिस व हृदयाच्या नऊ शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीपणे झाल्या व अन्य ६३ शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कुंभी-धामणी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांचेही प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
माझ्या मुलाची स्कोलिओसिस रोगाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ११ लाख ८० हजार रुपयांचा खर्च होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती करू शकत नव्हतो. खासदार राऊत यांच्या सहकार्यामुळे ती होऊ शकली, त्यांच्यामुळेच माझ्या मुलाचे पुनर्जीवन झाले.
पांडुरंग शिंदे
वेतवडे (ता. गगनबावडा)
माझा एकुलता मुलगा समर्थ याच्या ह्रदयाला छिद्र होते, शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च मोठा असल्याने व माझी परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रिया करू शकत नव्हतो. कुंभी धामणी सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून मोफत शस्त्रक्रिया झाली.
रामचंद्र जाधव,
शिरोली दुमाला (ता. करवीर)