नऊ नगरसेवकांवर जातवैधतेची टांगती तलवार
By Admin | Published: May 18, 2017 01:21 AM2017-05-18T01:21:31+5:302017-05-18T01:21:41+5:30
इचलकरंजी नगरपालिका : अंतीम मुदत २८ मे; नगरसेवकांची तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष अलका स्वामी व आठ नगरसेवकांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे प्रलंबित आहे. त्यातील तीन नगरसेवकांची २२ मे रोजी सुनावणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडून आलेल्या २३ नगरसेवकांपैकी १४ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत २८ मे असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सादरीकरण प्रलंबित असणाऱ्यांची कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी चांगलीच धावपळ उडाली आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत इचलकरंजी नगरपालिकेत ६२ जागांपैकी आरक्षित असलेल्या जागांवर २३ नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या सर्वांना जातपडताळणी विभागाकडून जातवैधता प्रमाणपत्र घेऊन २८ मेच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करायचे आहे. त्यातील आजपर्यंत कॉँग्रेस - संजय केंगार, ध्रुवती दळवाई, अब्राहम आवळे, दीपक सुर्वे, सायली लायकर. भाजप - सारिका धुत्रे, संध्या बनसोडे, तानाजी पोवार. राष्ट्रवादी - शोभा कांबळे, लतीफ गैबान, तानाजी हराळे. शाहू विकास आघाडी - शुभांगी माळी, अनिता कांबळे, विठ्ठल चोपडे व मंगेश कांबुरे या चौदा सदस्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे.
तर उर्वरित कॉँग्रेस - लक्ष्मी पोवार. भाजप - सोनाली अनुसे, नेहा हुक्किरे आणि ताराराणी आघाडी - सरिता आवळे, रवींद्र लोहार, इकबाल कलावंत, पल्लवी साखरे व वर्षा जोग असे पाचही सदस्यांचे मिळून एकूण नऊ सदस्यांनी अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत. त्यातील सरीता आवळे, इकबाल कलावंत व रवींद्र लोहार या तिघांच्या जातीच्या दाखल्यांबाबत तक्रारी झाल्याने त्यांची सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.
दाखल्यांचे पक्षीय स्पष्टीकरण
एकूण आरक्षित असलेल्या २३ जागांपैकी निवडून आलेल्या कॉँग्रेसच्या ६ सदस्यांपैकी ५ जणांनी दाखले दिले. १ प्रलंबित, भाजप ५ पैकी ३ सदस्यांनी दिले. २ प्रलंबित, ताराराणी आघाडीच्या ५ पैकी ५ ही प्रलंबित, तर शाहू आघाडीच्या ४ व राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांनी दाखले दिले आहेत.
नगराध्यक्षांचा दाखला प्रलंबित
नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी बेडा जंगम या जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढविली आहे. त्यांनीही अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तसेच त्यांचा हा जातीचा दाखला बोगस असल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार दशरथ माने यांनी केली होती. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.