फौंड्री क्लस्टरचे नऊ कोटी जमा

By admin | Published: January 6, 2015 09:17 PM2015-01-06T21:17:48+5:302015-01-06T21:18:06+5:30

तिसरा हप्ता : उद्योगाला मिळणार चालना; डिसेंबरअखेर होणार कामे पूर्ण

Nine Crore deposits of Foundry Cluster | फौंड्री क्लस्टरचे नऊ कोटी जमा

फौंड्री क्लस्टरचे नऊ कोटी जमा

Next

सतीश पाटील - शिरोली -फौंड्री क्लस्टरला नऊ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता नुकताच जमा झाला आहे. केंद्र शासनाकडून क्लस्टरसाठी आतापर्यंत सुमारे २७ कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेले क्लस्टरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.उद्योगांना प्राथमिक सुविधा, अत्याधुनिक मशिनरी, प्रयोगशाळा, सांस्कृतिक सभागृह उपलब्ध व्हावे यासाठी सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या ४२ कोटी रुपयांचा फौंड्री क्लस्टर आराखडा तयार केला होता. तो मंजूर होऊन ७५ टक्के रक्कम केंद्र शासन, १० टक्के महाराष्ट्र शासन आणि १५ टक्के स्थानिक उद्योजकांचे, असे एकूण ४२ कोटी रुपयांचे हे क्लस्टर मंजूर झाले आहे.या क्लस्टरसाठी तीन टप्प्यांत केंद्र शासनाचा २७ कोटी निधी आला आहे, तर राज्य शासनाचा दोन टप्प्यांतील निधी आला असून, उद्योजकांनीही १५ टक्के गुंतवणूक केली आहे. यासाठी चीनहून सँड प्लँटची मशिनरी आली आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतीत सँड प्लँटसाठी शेड मारण्याचे काम सुरू असून, मार्चपर्यंत हे शेड पूर्ण होईल. आॅक्टोबर २०१५ पर्यंत प्लँट सुरू होईल. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटरची इमारत बांधून तयार आहे.
याशिवाय कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये अत्याधुनिक सभागृह, रामभाई सामाणी हॉल, कॅडकॅमचे काम पूर्णत्वास आले आहे. कॅडकॅममुळे कोल्हापुरातील लघुउद्योगांना अनुभवी मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी अंदाजे एक कोटी ४० लाखांचा खर्च येईल. जयसिंगपूर येथील एल. के. अकिवाटे आणि शिरोळमधील अशोकराव माने औद्योगिक वसाहतीला रस्ते, ड्रेनेज, स्ट्रिटलाईट, पाणी यासाठी सुमारे सात कोटी रुपये क्लस्टरमधून मंजूर आहेत. ही कामेही अंतिम टप्प्यात आहेत. क्लस्टरमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा चेहरा बदलणार आहे. उद्योगांना आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. डिसेंबर सन २०१५ पर्यंत सर्व क्लस्टर पूर्ण होईल, असे उद्योजकांना सांगितले.

कोठे किती कामे
४२ कोटींच्या क्लस्टरमधून शिरोली औद्योगिक वसाहतीत १४ कोटी ८८ लाख रुपयांचे आणि गोकुळ शिरगाव औद्योेगिक वसाहतीत १८ कोटींचे सँडरिक्लेमेशन प्लँट उभारले जात आहेत. जयसिंगपुरातील एल. के. अकिवाटे आणि शिरोळमधील अशोकराव माने औद्योगिक वसाहतीत सात कोटींची कामे मंजूर आहेत. ही कामे सुरू असून, अंतिम टप्प्यात आहेत. कामे झाल्यानंतर वसाहतींना नवे रूप मिळेल.


क्लस्टरमधील शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या सँड प्लँटमुळे फौंड्रीतील वेस्ट सँडचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. वेस्ट सँड पुन्हा वापरात येईल. उद्योजकांनाही त्याचा फायदा होणार आहे.
- अतुल पाटील, संचालक स्मॅक


फौंड्री क्लस्टरमुळे इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले. याठिकाणी रस्ते, पाणी, ड्रेनेज यांचा अभाव होता. क्लस्टरच्या माध्यमातून ते पूर्ण झाले आहेत. त्याचा येथील उद्योजकांना फायदा झाला आहे.
- आर. पी. जोशी, व्यवस्थापक, एल. के. अकिवाटे


इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये होत असलेल्या कॅडकॅम सेंटरमुळे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. महिन्याला २४०० कर्मचारी हा कोर्स पूर्ण करू शकणार आहेत.
- रवींद्र तेंडुलकर, अध्यक्ष कोल्हापूर इंजि.

Web Title: Nine Crore deposits of Foundry Cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.