जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 02:22 PM2020-07-07T14:22:57+5:302020-07-07T14:30:43+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी मंगळवारी १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी कोल्हापूर शहरात दिवसभर चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला, तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत पावसाची नोंद आहे.
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ११०० घनफूट तर कोयनेतून २१११ घनफूट विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी १७ फुटांवर गेली आहे. पाच बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे मार्ग, तर गगनबावडा ते गगनगिरी मार्गावरील मोरी वाहून गेल्याने रस्ते बंद आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गवसे सर्कलमध्ये १४२, तर राधानगरी सर्कलमध्ये ७४ मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ९७.९४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून११०० तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली व भोगावती नदीवरील हळदी असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३५.६१ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७४.०५१ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ४३.२१ दलघमी, वारणा४५१.७० दलघमी, दूधगंगा ३३२.५२ दलघमी, कासारी ३५.९९ दलघमी, कडवी २८.०५ दलघमी, कुंभी ३७.८० दलघमी, पाटगाव ५०.६९ दलघमी, चिकोत्रा १७.४२ दलघमी, चित्री १६.७३ दलघमी, जंगमहट्टी १०.३० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे १९.६३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम १७.१० फूट, सुर्वे १८.१० फूट, रुई ४५.९ फूट, इचलकरंजी ४२ फूट, तेरवाड ३९.९ फूट, शिरोळ ३१.९ फूट, नृसिंहवाडी २४.९ फूट, राजापूर १६ फूट तर नजीकच्या सांगली ८ फूट व अंकली ९.६ फूट अशी आहे.