पहिल्याच दिवशी महालक्ष्मीमधून नऊशेजणांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:59 AM2021-02-02T10:59:08+5:302021-02-02T11:00:35+5:30
Railway Kolhapur- कोरोना महामारीनंतर तब्बल दहा महिने सहा दिवसांनंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पावणे नऊ वाजता शाहू छत्रपती टर्मिनन्स कोल्हापूर स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नऊशेहून अधिक प्रवाशांनी या रेल्वेचे आरक्षण केले होते.
कोल्हापूर : कोरोना महामारीनंतर तब्बल दहा महिने सहा दिवसांनंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पावणे नऊ वाजता शाहू छत्रपती टर्मिनन्स कोल्हापूर स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नऊशेहून अधिक प्रवाशांनी या रेल्वेचे आरक्षण केले होते.
गेले दहा महिन्यांपासून बंद असलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी. याकरिता कोल्हापुरातील प्रवासी संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली होती. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाकडून केंद्राने दिलेल्या एसओपीप्रमाणे रेल्वे गाड्या सुरू करता येत नाहीत, असे उत्तर दिले जात होते.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी केंद्राशी पत्रव्यवहार करून अखेर ही गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून संमती मिळवली. यापूर्वी मध्य रेल्वेकडून कोल्हापूर-मुंबई लोहमार्गावर कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू झाल्या आहेत.
सोमवारी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या दीर्घ कालावधीनंतरच्या पहिल्याच फेरीचे उद्घाटन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी श्रीफळ वाढवून व बोगीस पुष्पहार अर्पण करून केले. उद्या, बुधवारपासून कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील हरिप्रिया ही रेल्वेगाडीही सुरू होत आहे. तिच्याही आरक्षणास कोल्हापूर, सांगली, मिरज, आदी ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही रेल्वे गाडीही तिरुपतीहून सोमवारी कोल्हापूरकडे येण्यास निघाली असून ती मंगळवारी कोल्हापुरातील शाहू छत्रपती टर्मिनन्स रेल्वेस्थानकात पोहोचणार आहे.