स्मशानभूमीच्या दानपेटीत नऊ लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:22+5:302021-05-21T04:25:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दीड वर्षात कोल्हापूरकरांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत टाकलेली रक्कम ९ लाख रुपयांपर्यंत गेली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षात कोल्हापूरकरांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत टाकलेली रक्कम ९ लाख रुपयांपर्यंत गेली. गुरुवारी सायंकाळी स्मशानभूमीतील ही दान पेटी फोडण्यात आली. तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे दान हे दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून जनतेने महापालिकेच्या अंत्यसंस्काराच्या कामावरच विश्वास व्यक्त केल्याचे दिसत आहे.
महानगरपालिका प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करत आहे. साधारणपणे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता पंधराशे रुपये खर्च येता. मानवतेच्या दृष्टिकोनातून गरीब असो अथवा श्रीमंत वर्गातील असो सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार मोफत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; परंतु ज्यांची चांगली ऐपत आहे, अशा नागरिकांकडून पालिकेला स्वत:हून देणगी म्हणून मदत केली नाही.
कोल्हापूर नाभिक समाज आणि जैन समाजाने यात पुढाकार घेत लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याठिकाणी दान पेटीसुद्धा बसवली. त्यानंतर त्यामध्ये दान पडायला लागले. गतवर्षी ही रक्कम साडेचार ते पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. यंदा मात्र या पेटीत नऊ लाख, नऊ हजार ३३४ रुपयांचे दान मिळाले.
गेल्या वर्षभरापासून स्मशानभूमीकडे पाहण्याचा कोल्हापूरवासीयांचा दृष्टीकोन बदलला असून मदत करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दानपेटीत नऊ लाख नऊ हजार ३३४ रुपये मिळाले, तर शेणी व लाकूड या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे. विशेष म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकही मदत देताना दिसत आहेत.
स्मशानभूमीतील दानपेटी खोलते वेळी उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, राहुल राजगोळकर, महेश भोसले उपस्थित होते.