बच्चे सावर्डे येथील एकाच कुटुंबातील नऊजणांना दहा वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 06:53 PM2021-02-10T18:53:58+5:302021-02-10T18:55:28+5:30
Court Kolhapur- बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे शेतजमिनीच्या वादातून भाऊबंदकीत वाद उफाळून तिघा चुलत पुतण्यांवर सशस्त्र हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊजणांना न्यायालयाने दोषी ठरविले. त्यांना दहा वर्षे कारावासाची व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कोल्हापूर : बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे शेतजमिनीच्या वादातून भाऊबंदकीत वाद उफाळून तिघा चुलत पुतण्यांवर सशस्त्र हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊजणांना न्यायालयाने दोषी ठरविले. त्यांना दहा वर्षे कारावासाची व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी बुधवारी ही शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. घटनेनंतर तब्बल आठ वर्षांनी निकाल लागला. खटल्याकडे पन्हाळा तालुक्याचे लक्ष लागले होते.
शिक्षा झालेल्यांची नावे : तुकाराम सखाराम बाऊचकर, गुंगा स. बाऊचकर, विलास स. बाऊचकर, युवराज स. बाऊचकर, विजय विलास बाऊचकर, गणेश वि. बाऊचकर, अविनाश गुंगा बाऊचकर, दीपक युवराज बाऊचकर, नीलेश य. बाऊचकर (सर्व रा. बच्चे सावर्डे).
बच्चे सावर्डे येथे शेतीच्या हद्दीच्या वादातून २०१२ ला सशस्त्र हल्ल्याची घटना घडली होती. हल्ल्यात रंगराव बाऊचकर, रामचंद्र बाऊचकर आणि कृष्णात बाऊचकर हे तिघे गंभीर जखमी झाले होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, बच्चे सावर्डे येथे बाऊचकर कुटुंबात जमिनीच्या हिश्श्यावरून वाद सुरू होता. दि. १६ नोव्हेंबर २०१२ रोजी रंगराव बावचकर हे कामधेनू दूध संस्थेत दूध घालण्यासाठी जात होते. वाटेत तुकाराम बाऊचकर याने त्यांना आडवून वाद घातला. त्यानंतर तुकारामसह गुंगा बाऊचकर, विलास बाऊचकर, युवराज बाऊचकर, विजय बाऊचकर, गणेश बाऊचकर, अविनाश बाऊचकर, दीपक बाऊचकर, नीलेश बाऊचकर यांनी त्यांच्यावर काठी, तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा कृष्णात आणि भाऊ रामचंद्र घटनास्थळी आले. त्यांच्यावरही सशस्त्र हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
खटल्यात, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी ११ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, पंचांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश शेळके यांनी बाऊचकर कुटुंबातील नऊजणांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.