सुन्न मनाला फुटले पुन्हा हुंदके--‘महापालिके’तर्फे पाच लाखांच्या मदतीचा धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:00 AM2017-10-10T00:00:46+5:302017-10-10T00:01:09+5:30
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात केएमटी बसला झालेल्या अपघातात कोणाचा कर्ता पुरुष गेला, तर कोणाचा कोवळा मुलगा गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात केएमटी बसला झालेल्या अपघातात कोणाचा कर्ता पुरुष गेला, तर कोणाचा कोवळा मुलगा गेला. अठराजण गंभीर जखमी झाले. त्यातील काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत. या दु:खाच्या वेदनांनी व्याकुळ झाल्यामुळे अनेकांचा आक्रोश झाला. आजही ही मनं सावरायला तयार नाहीत. सोमवारी सायंकाळी मात्र महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी जेव्हा अपघातग्रस्तांच्या गल्लीत पोहोचले तेव्हा मात्र सुन्न मनांना पुन्हा एकदा हुंदके फुटले. या दु:खावेगाने महापौर हसिना फरास, नगरसेविका दीपा मगदूम, माधवी गवंडी, शमा मुल्ला यांनाही आपले हुंदके आवरता आले नाहीत.
पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर झालेल्या बस अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत महापौर हसिना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जाहीर केली होती. या मदतीचे धनादेश देण्यासाठी महापौर फरास, आयुक्त चौधरी, सभागृह नेते प्रवीण केसरकर, शिक्षण सभापती वनिता देठे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक संदीप कवाळे, संजय मोहिते, अशोक जाधव, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळे, शोभा बोंद्रे, उमा बनछोडे, शमा मुल्ला, भाग्यश्री शेटके, अतिरिक्तआयुक्त श्रीधर पाटणकर, केएमटीचे अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले, आदींनी अपघातातील मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीचे धनादेश दिले.
सुजल अवघडे या चौदा वर्षांच्या कोवळ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय आजही दु:खावेगाने
व्याकुळ आहेत. त्याच्या छोट्याशा घरात महापौर फरास यांच्यासहदीपा मगदूम, माधुरी गवंडी,शमा मुल्ला पोहोचताचसुजलच्या आईने पुन्हा हंबरडा फोडला. ‘माझ्या पोराची काय चूकहोती’ अशी विचारणा करताच सर्वांनाच भडभडून आले. चौघींनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.तीन कुटुंबांतील सदस्य धक्क्याने हादरून गेले असून, ती कुटुंबे अद्याप सावरलेली नाहीत. जे जखमी आहेत त्यांच्याही घरात दु:खाच्या वेदना आहेत. एकूणच राजारामपुरी मातंग वसाहतील वातावरण भयग्रस्त आहे.