रवी इंगवलेंसह नऊ जणांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:11+5:302021-03-10T04:26:11+5:30
कोल्हापूर : ब्रह्मपुरी येथील ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन धमकावल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह नऊ संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा ...
कोल्हापूर : ब्रह्मपुरी येथील ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन धमकावल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह नऊ संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये सुशील भांदीगरे, रेव्हरंड गोगटे, संजय आवळे, संदीप आवळे, अरुण खोडवे, संजय महाजन, अबिगेल भोसले, शैला बिरांजे व इतर अनोळखी ५० ते ६० जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ब्रह्मपुरी चर्च येथील बॉइज हॉस्टेलमधील ट्रस्टच्या कार्यालयात दि. १ मार्चला दुपारी जीवन दत्तू आवळे हे काम करत बसले होते. त्यावेळी संबधित नऊ जण कार्यालयात आले. त्यांनी हे कार्यालय ब्रह्मपुरी चर्चच्या मालकीचे असल्याचे सांगत आवळे यांना दमदाटी करून कार्यालयातून ढकलून बाहेर काढले. पण ते पुन्हा कार्यालयात जाऊन बसले. तसे जमावाने, हे कार्यालय स्थानिकांचे आहे, तुमचा कोणताही अधिकार नाही असे म्हणतच कार्यालयास बाहेरून कुलूप लावून आवळे यांना कोंडून ठेवले अशी फिर्याद जीवन आवळेंनी दिली. त्यानुसार नऊ संशयितांवर गुन्हा दाखल झाला.