दुहेरी खूनप्रकरणी कोल्हापुरातील नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:25+5:302021-03-07T04:21:25+5:30

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून व पैसे देवघेणीच्या वादातून टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू, कोयता अशा प्राणघातक हत्याराने ...

Nine people from Kolhapur sentenced to life imprisonment for double murder | दुहेरी खूनप्रकरणी कोल्हापुरातील नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

दुहेरी खूनप्रकरणी कोल्हापुरातील नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

Next

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून व पैसे देवघेणीच्या वादातून टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू, कोयता अशा प्राणघातक हत्याराने दोघा तरुणांचा निर्घृण खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा पैकी नऊ जणांना दोषी ठरवले. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण (वय ३५), साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे (३२ दोघेही रा. टेंबलाई झोपडपट्टी, रेल्वे फाटक), रियाज उर्फ काल्या सदरू देसाई (३८), विशाल सागर गिरी (२७), फारुक अहमद शेख (३४), सद्दामहुसेन नजीर देसाई (३०), इम्रान राजू मुजावर (३०), रोहित सुधीर कांबळे (२८, सर्व रा. विक्रमनगर), धनाजी वसंतराव मिसाळ,(रा. राजेंद्रनगर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले.

याप्रकरणी नितीन महादेव शिंदे (वय २९, रा. राजारामपुरी १३वी गल्ली) व समीर सिराज खाटीक (वय २१, रा. टेंबलाईनगर झोपडपट्टी, रेल्वेफाटक) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तब्बल सात वर्षांनी खटल्याचा निकाल लागल्याने जिल्ह्याचे खटल्याकडे लक्ष लागले होते. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने अमोल नंदकुमार हळदकर याची निर्दोष मुक्तता झाली.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, समीर खाटीक व आरोपी घायल कवाळे हे दोघे शेजारी राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वादावादी झाल्याने एकमेकांवर राग होता. दरम्यान, नितीन शिंदे व समीर खाटीक यांच्या रमी क्लबवरील कामगार अमित हेगडे याने आरोपी हणमा चव्हाण याच्याकडून पैसे व्याजाने घेतले होते. ते परतफेडीवरून हणमा चव्हाण याने हेगडेसोबत दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी बैठक घेतली. बैठकीत मध्यस्ती करणारा नितीन शिंदे याच्याशी वादावादी झाली. त्याबाबत हेगडे याने चव्हाण याच्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली. तक्रार देताना हेगडे हा सोबत शिंदे होता. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री उशिरा नितीन शिंदे व समीर खाटीक हे टेंबलाई रेल्वेफाटक, उड्डाण पूुल परिसरात थांबले होते. त्यावेळी हणमा चव्हाण याच्यासह दहा जण चारचाकी वाहनातून चौकात आले. त्यावेळी तलवार, चॉपर, चाकू अशा हत्यारासह त्यांनी नितीन शिंदे व समीर खाटीक यांचा पाठलाग करून सपासप वार करून दगडाने ठेचून त्यांचा निर्घृण खून केला.

खटल्यात, एकूण ३४ साक्षीदार तपासले. यामध्ये तिघे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन पोलीस, तीन वैद्यकीय अधिकारी आदींच्या साक्षी व सहायक सरकारी वकील एम. बी. पाटील यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यातून नऊ आरोपींना न्यायाधीशांनी दोषी ठरवले. या सर्वांना कट रचणे, संघटित गैरप्रकार करणे, निर्घृण खून करणे या गुन्ह्याखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पो. नि. नवनाथ घुगरे, उपनिरीक्षक विकास जाधव, किशोर डोंगरे, बाजीराव सूर्यवंशी, दिवंगत पोलीस विजय घाटगे, पैरवी अधिकारी मारुती नाईक, अशोक शिंदे यांनी केला.

मोठ्या संख्येने शिक्षा होण्याची दुसरी घटना

यापूर्वी पाचगावमधील अशोक पाटील याच्या खूनप्रकरणी सहा वर्षांपूर्वी न्यायालयाने दोन्ही गटांच्या तब्बल आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शनिवारी दुहेरी खूनप्रकरणी सुमारे नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे मोठ्या संख्येने आरोपींना शिक्षा होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ होय.

आरोपी ‘व्हिसी’द्वारे न्यायालयात हजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोपींना कारागृह प्रशासनाने दक्षता घेत शनिवारी खटल्याच्या निकालावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले.

नातेवाइकांचा आक्रोश

निकाल ऐकण्यासाठी आरोपींचे नातेवाइकांनी तसेच मित्रांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जाहीर केल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी न्यायालय परिसरात आक्रोश केला.

फोटो पाठवत आहे.....

Web Title: Nine people from Kolhapur sentenced to life imprisonment for double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.