नऊ प्रश्न रद्द करण्याची परीक्षा परिषदेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:45 PM2020-03-07T12:45:28+5:302020-03-07T12:48:39+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.

Nine questions abolished on the Examination Council | नऊ प्रश्न रद्द करण्याची परीक्षा परिषदेवर नामुष्की

नऊ प्रश्न रद्द करण्याची परीक्षा परिषदेवर नामुष्की

googlenewsNext
ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेतील सावळागोंधळ तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.

आपल्याकडे शिष्यवृत्ती परीक्षेला खूपच महत्त्व दिले जाते. मुले पहिलीला गेल्यापासूनच पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी सुरू करतात. चौथीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू केला जातो. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी नसतेच. शाळा सुरू झाल्यानंतर तर मुले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यासातच गुंतलेली असतात. मात्र या परीक्षेकडे संबंधित यंत्रणा किती गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कोणतीही परीक्षा असूदे; तिचे नियोजन काटेकोरपणे असायलाच पाहिजे. पेपर तयार करण्यापासून त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत त्या नियोजनानुसार अचूक काम होणे अपेक्षित असते. त्यातून किरकोळ चुका होतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका होताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या परीक्षेत चार प्रश्नच चुकीचे होते. त्यावेळी ते रद्द करून ३०० ऐवजी २९२ गुणांचे प्रश्न गृहीत धरून निकाल दिला.

गेल्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेता या वर्षी तरी त्यात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र उलट दुप्पट चुका झाल्या. तब्बल नऊ प्रश्नच चुकीचे होते आणि १२ प्रश्न असे होते की, ज्यांचे एकापेक्षा अधिक पर्याय योग्य होते. यामुळे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले होते. मुले न सुटणाऱ्या प्रश्नांभोवतीच गुरफटत राहिल्याने अनेकांना पूर्ण पेपर सोडविता आला नाही.

परीक्षा परिषदेने काढलेल्या उत्तरसूचीत नऊ प्रश्न रद्द केल्याचे म्हटले आहे; तर १२ बहुपर्यायी प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरे दिली आहेत. यावरून परिषदेचा सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मुले वर्षभर खेळ, पाहुण्यांच्या गावाला जाणे टाळून शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतात आणि परीक्षेत चुकीचे प्रश्न आले तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परीक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे.
- सुनील पाटील,
जरगनगर
 

 

Web Title: Nine questions abolished on the Examination Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.