महामार्गावरून ९ दुचाकी, एक कार वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:18+5:302021-07-24T04:16:18+5:30
शिरोली : शिरोली - सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सायंकाळी ५.१० मिनिटांनी बंद केली. ...
शिरोली :
शिरोली - सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सायंकाळी ५.१० मिनिटांनी बंद केली. यामुळे महामार्गावर सुमारे दोन हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. पाण्याच्या प्रवाहातून एक कार व ९ मोटारसायकली वाहून गेल्या. कारचालक राजेंद्र केरबा चौगुले (रा. कोल्हापूर) या पोलीस काॅन्स्टेबलला वाचवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर आलेल्या पाण्याला मोठा प्रवाह होता. या पाण्यातून दुचाकी वाहनधारक येत असताना ९ दुचाकी वाहून गेल्या, तर सातजण वाहून जाताना शिरोली पोलिसांनी त्यांना वाचवले.
संततधार पावसामुळे गुरुवारी सायंकाळी सेवा मार्गावर पाणी आले होते. त्यानंतर पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आले. दीड ते दोन फूट पुराचे पाणी मार्गावर असताना, त्यामधून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू होती. त्यानंतर तासाभरातच या मार्गावरील पाणी वाढल्याने, बॅरिकेटस् लावून वाहतूक बंद करण्यात आली. दोन तासांमध्येच पाणी महामार्ग दुभाजकावरून वाहू लागले. त्यामुळे शिरोली पोलीस प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक बंद केली आणि राष्ट्रीय महामार्गावर पूर्णतः ठप्प झाला आणि कोल्हापूरचा संपर्क तुटला.
सायंकाळी सातच्यासुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे पाच फूट पाणी होते, तर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. यावेळी २०१९ च्या तुलनेत वेगाने पाणी वाढले असून, पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.
सांगली फाटा, नागाव फाटा, महाडिक बंगला येथे पोलीस बंदोबस्त असून, महामार्गावरील वाहतूक बॅरिकेटस् लावून बंद केली आहे.
--
-
चौकट
शिरोली पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतरही तावडे हॉटेलकडून पुण्याच्या दिशेने वाहन येत होती. पाण्याच्या प्रवाहातून धाडस करून वाहन येत होती. यावेळी सुमारे दहा मोटारसायकली वाहून गेल्या. चालकाने गाडी सोडून दिल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
सायंकाळी सातच्यासुमारास राजेंद्र केरबा चौगुले हे पोलीस काॅन्स्टेबल चारचाकी गाडीतून इचलकरंजी-शिवाजीनगर येथे कामावर चालले होते. त्यांनी पाण्याच्या प्रवाहातून येण्याचा प्रयत्न केला. प्रवाहामुळे कार वाहून गेली, तर चौगुले यांनी प्रसंगावधान राखून विजेच्या खांबाचा आधार घेतला. त्याना शिरोली येथील समीर सनदे यांनी बाहेर काढले. पोलीस प्रशासन सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले व माजी आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक कार्यकर्त्यांसह प्रयत्न केले.
प्रतिक्रिया
महापुराची परिस्थिती गंभीर बनत असून, पाणी वेगाने वाढत आहे. यामुळे वाहनधारक व प्रवाशांनी धोका पत्करून प्रवास करू नये.
किरण भोसले, सहायक पोलीस निरीक्षक
फोटो ओळी
राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे आलेले महापुराचे पाणी.
फोटो मेल केले आहे..