कोविड लस संपल्याने नऊ लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:55+5:302021-04-08T04:24:55+5:30
कोल्हापूर : कोविड - १९ लसीचा साठा संपत आल्यामुळे तसेच नव्याने पुरवठा न झाल्यामुळे आज (गुरुवार)पासून शहरातील अकरापैकी ...
कोल्हापूर : कोविड - १९ लसीचा साठा संपत आल्यामुळे तसेच नव्याने पुरवठा न झाल्यामुळे आज (गुरुवार)पासून शहरातील अकरापैकी दोनच लसीकरण केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने बुधवारी घेतला. नागरी आरोग्य केंद्र - सदर बाजार व फिरंगाई याठिकाणी लसीकरण सुरु राहणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर अन्य केंद्र पूर्ववत सुरु केली जातील, असे सांगण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेने मोठ्या उत्साहाने शहरात अकरा केंद्र सुरु करुन रोज प्रत्येक केंद्रावर ३०० व्यक्तींचे लसीकरण सुरु केले. बुधवारी २,९६२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. परंतु, आता लसीचा साठा संपल्याने तसेच नवीन साठा मागणी करुनही मिळाला नसल्याने नऊ केंद्र तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत. जेव्हा लसीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होईल तेव्हा ती सुरु केली जातील, असे सांगण्यात आले.
शासन आदेशाप्रमाणे कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत दिनांक १६ जानेवारीपासून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे आतापर्यंत ७४ हजार ०५७ पात्र लाभार्थ्यांना पहिला डोस तर ८,३६४ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील ३० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना, दुसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्षातील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीरकरण सुरु करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक १ एप्रिलपासून शहरामध्ये ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
शासनाकडून आतापर्यंत ७८ हजार १२० इतक्या कोविड-१९ डोसचा महापालिकेला पुरवठा झाला. त्यापैकी ७४ हजार ०५७ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर ८,३६४ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
शहरातील खासगी रुग्णालयात मात्र लस उपलब्ध असून, २५० रुपये नाममात्र शुल्क आकारुन लसीकरण करुन घेता येणार आहे. यामध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक व ट्रॉमा केअर सेंटर, मसाई, ॲपल, स्वस्तिक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल व डायलेसिस सेंटर, डायमंड, ओमसाई आँकॉलॉजी, सिध्दीविनायक, सनराईज, सिध्दीविनायक नर्सिंग होम, मगदूम एंडोसर्जरी इन्स्टिट्यूट, ॲस्टर आधार, मेट्रो, दत्त साई, प्रिस्टीन, मोरया, अंतरंग, गंगाप्रसाद या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.