यळगुडच्या नऊ वर्षीय मुलीला सावत्र बापानेच पंचगंगा नदीत ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:53+5:302021-08-24T04:29:53+5:30
इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय मुलीला तिच्या सावत्र बापानेच इचलकरंजीतील पंचगंगा नदीत ढकलून ...
इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय मुलीला तिच्या सावत्र बापानेच इचलकरंजीतील पंचगंगा नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रणाली युवराज साळुंखे असे तिचे नाव आहे. पोलिसांनी पंचगंगा नदीत दोन बोटीच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली; परंतु प्रणालीचा शोध लागला नाही. मोबाइल लोकेशन व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.
यळगूड येथून रविवारी (दि.२२) प्रणाली साळुंखे ही नऊ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची पोस्ट तिच्या फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्याचबरोबर तिचे सावत्र वडील युवराज साळुंखे याने ती बेपत्ता असल्याची तक्रार हुपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाचे अपहरण करून खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याने त्यांनी तत्काळ यंत्रणा गतिमान करत या मुलीचा शोध घेण्याचे काम वेगवेगळ्या पथकांमार्फत सुरू केले. या प्रकरणातील प्रणालीचा सावत्र बाप युवराज (रा. यळगूड) याने यापूर्वी दोन वेळा विवाह केला होता. अपत्य होत नसल्याने त्याने दोन्हीही पत्नींना सोडचिठ्ठी दिली आणि इचलकरंजीतील एका विवाहित महिलेशी त्याने तिसरे लग्न केले. तिसऱ्या पत्नीला तिच्या पहिल्या पतीपासून प्रणाली ही मुलगी होती. त्याने मुलीसह तिचा स्वीकार केला होता. दरम्यान, मुलीच्या कारणावरून घरामध्ये वारंवार वादविवाद होत होता. त्या रागातून त्याने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
युवराज याने २२ ऑगस्टला हुपरी पोलीस ठाण्यात मुलगी प्रणाली बेपत्ता झाल्याची वर्दीही दिली आहे. तपासामध्ये पोलिसांना युवराजवर संशय आल्याने त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने जंगमवाडीच्या माळावर तिला सोडून आल्याचे सांगितले होते. त्यानुसार हुपरी पोलिसांच्या सोबत शिवाजीनगर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. रेंदाळ परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये युवराज मुलीला घेऊन गेल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुन्हा कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने प्रणालीला पंचगंगा नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पंचगंगा नदीकाठावर तिचे चप्पल आढळले. त्यामुळे पोलिसांनी नदीमध्ये दोन बोटींच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आज, मंगळवारी सकाळी सात वाजता आणखीन दोन बोटी सोबत घेऊन शोधकार्य सुरू केले जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांनी सांगितले.