बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 01:51 PM2023-11-17T13:51:26+5:302023-11-17T13:52:41+5:30

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या ...

Ninety percent of the country resources are concentrated in the hands of only ten percent of the people says Dr. Anand Mense | बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानामुळे लाखो कामगारांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. भविष्यात नवीन नोकऱ्या, तसेच रोजगार संधी उपलब्ध होणार नाहीत. सरकारी मालकीचे सर्वच उद्योग सत्ताधारी खासगी लोकांना विकत आहेत. या गोष्टींकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी धर्माधर्मांत, जाती-जातीविरोधात लढवले जात आहे. म्हणून सजग बहुजनांनी साधनसंपत्तीतील आपला वाटा मागण्यासाठी लढा उभारायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांनी मंगळवारी येथे केले.

बळीराजा महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विद्रोही चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ.माधुरी सुदाम चौगुले, शाहीर रंगराव पाटील आणि चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया यांचा डॉ. मेणसे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तिघांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दलित मित्र साथी व्यंकाप्पा भोसले, शाहीरभूषण राजू राऊत यांचाही सत्कार करण्यात झाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.

डॉ.मेणसे म्हणाले की, सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बंदी सुरू केली आहे. जे प्राथमिक शिक्षण या भूमीत लोकराजा राजर्षी शाहूंनी सक्तीचे आणि मोफत केले होते. त्याच ठिकाणी सरकार सर्व प्रकारचे शिक्षण खासगी लोकांच्या हाती देत आहे. उठता बसता शिवशाही फुले आंबेडकर यांचे नाव घेणारे सत्ताधारी आपले शिक्षणच बंद करीत आहेत. पुन्हा एकदा बहुजनांना गुलाम करण्याची षडयंत्र आखले जात आहे.

महोत्सवाची सुरवात मिरजकर तिकटी येथून सजीव बळीराजाची भव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल, लेझीम पथक व शेकडो माता-भगिनी, बांधवांच्या सहभागाने सुरू झाली. ‘ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..!’ अशा घोषणा देत मिरवणूक गंगावेशमधील शाहू सत्यशोधक समाजाच्या दारात उभारलेल्या महात्मा जोतिराव फुले सभागृहात विसर्जित झाली. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पायाने दुष्ट वामनाला पाताळात गाढून झाली.

महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पोवार म्हणाले, “बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव करण्यासाठी आगामी काळात अनेक सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविणार आहे. पुढील वर्षाच्या बळीराजा महोत्सव समितीत युवकांचा खूपच मोठा सहभाग असणार आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी स्वागत केले. समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ.टी.एस्.पाटील यांनी परिचय करून दिला. शफिक देसाई यांनी सूत्रसंचलन केले. रवी जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Ninety percent of the country resources are concentrated in the hands of only ten percent of the people says Dr. Anand Mense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.