निपाणी पालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:15+5:302021-02-27T04:32:15+5:30
निपाणी : प्रतिनिधी निपाणी नगरपालिकेचे सभापती सद्दाम नगारजी यांनी शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्प बैठकीत निपाणी पालिकेचा २०२१-२२ सालाचा अर्थसंकल्प सादर ...
निपाणी : प्रतिनिधी
निपाणी नगरपालिकेचे सभापती सद्दाम नगारजी यांनी शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्प बैठकीत निपाणी पालिकेचा २०२१-२२ सालाचा अर्थसंकल्प सादर केला. कर व अन्य निधीतून पालिकेला येणाऱ्या ३४ कोटी ७ लाख ६१ हजार ३७९ निधीतून शहराच्या विकासासाठी ३३ कोटी ९७ लाख ५५ हजार ७२४ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
यावर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. १० लाख ५ हजार ६५५ रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक यावेळी मांडण्यात आले आहे.
नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, आयुक्त महावीर बोरननवर यांच्या व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाकरिता या अर्थसंकल्पात साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर आंबेडकर भवनासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजी मार्केट येथे नवीन संकुल उभारणे, सार्वजनिक कामे, रस्ता, फूटपाथ, सार्वजनिक पथदीप, शौचालय, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक उद्यान, बीपीएल रेशनकार्डधारकांना दफनविधीकरिता निधी, महात्मा गांधींचा पुतळा उभारणे, मुन्सिपल शाळेची नवीन इमारत बांधणे, गणवेश खरेदी, वैयक्तिक शौचालय अनुदान व इतर कामे अशा विविध कामांसाठी १३ कोटी २९ लाख १९ हजार ६४२ रुपयाचा अर्थसंकल्प मांडला आहे. शिवजयंती, आंबेडकर जयंतीसाठी दोन लाखऐवजी पाच लाख निधी द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बैठक गुंडाळली
अर्थसंकल्प सादर करतानाच नगरसेवक विलास गाडीवडर यांनी प्रभाग क्रमांक २६ मधील पेव्हर ब्लॉक गायब होण्यामागे कोणाचा हात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी भाजप नगरसेवक व विरोधक नगरसेवक यांच्यात खडाजंगी झाली. वारंवार सूचना देऊनही विरोधी नगरसेवक ऐकत नसल्याने नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
फोटो
निपाणी : सभापती सद्दाम नगारजी यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे व नगरसेवक.