घरभेटीतून ‘निर्मल ग्राम’चे प्रबोधन
By Admin | Published: August 27, 2016 12:45 AM2016-08-27T00:45:31+5:302016-08-27T00:48:20+5:30
सुषमा देसाई : २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करणार; लोकप्रतिनिधींचा सहभाग
कोल्हापूर : जिल्हा ८९ टक्के निर्मल ग्राम झाला असून, २ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी घरभेटीच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे. यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील सर्वांत जास्त निर्मल ग्रामपंचायती म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव झाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे केंद्र शासनाच्या पातळीवरही जिल्ह्याने कामाचा ठसा उमटविला. केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत ‘शौचालययुक्त गावा’ची संकल्पना नव्याने मांडली. सध्या जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. ३८० ग्रामपंचायती २ आॅक्टोबरपूर्वी निर्मल करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा ९७ टक्के निर्मलग्राम असतानाही जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ८०८ कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे निदर्शनास आले असून, यापैकी ५८ हजार शौचालये बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी तालुकानिहाय ‘घरभेटी’चे नियोजन केले असून, सहा हजार घरभेटी पूर्ण केल्या आहेत. या भेटींत हस्तपत्रिका वाटप करून शौचालय नसणाऱ्या घरांवर ‘रेड स्टिकर्स’ लावली जाणार आहेत. या भेटीत मंत्रिमहोदयांसह लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, असे अभिप्रेत असल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘स्वच्छ भारत’ मिशनअंतर्गत २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करण्याचा संकल्प असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
- चंद्रकांतदादा पाटील,
पालकमंत्री
बारा हजारांचे अनुदान!
शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला बारा हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के, तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा राहणार असून, वर्षभरात आठ कोटींचे अनुदान दिल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले.