मुलीला उच्चशिक्षित केले.. वडिलांचे स्वप्न अधुरे राहिले; कोल्हापुरातील निर्मिती शिंदे हिचे जर्मनीत निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:11 PM2024-06-19T12:11:54+5:302024-06-19T12:12:45+5:30

दीड महिन्यापूर्वीच गेली होती जर्मनीला

Nirvana Shinde from Kolhapur passed away in Germany | मुलीला उच्चशिक्षित केले.. वडिलांचे स्वप्न अधुरे राहिले; कोल्हापुरातील निर्मिती शिंदे हिचे जर्मनीत निधन 

मुलीला उच्चशिक्षित केले.. वडिलांचे स्वप्न अधुरे राहिले; कोल्हापुरातील निर्मिती शिंदे हिचे जर्मनीत निधन 

कोल्हापूर : आईचे चार वर्षांपूर्वींच निधन झालेले. त्यामुळे तिची आई बनूनच वडिलांनी तिला कष्टातून शिकवले. संगणक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीलाही पाठविले. आपली मुलगी जर्मनीत शिकतेय, याचा वडिलांना केवढा आनंद. मात्र, ताप आल्याचे निमित्त झाले अन् जर्मनीतच ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने मुलीचे निधन झाले. फादर्स डे च्या दिवशीच लाडक्या लेकीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ दुर्दैवी बापावर आली. निर्मिती सुरेश शिंदे (वय २६, रा. प्रतिराज हाईट्स शिवाजी पेठ) असे निधन झालेल्या मुलीचे नाव.

कोल्हापुरातील शिवाजी पेठ, वेताळ तालीमजवळील प्रतिराज हाईट्समध्ये शिंदे कुटुंबीय वास्तव्यास होते. सुरेश शिंदे हे वृत्तपत्रात मुद्रित शोधक आहेत. मोठ्या कष्टातून त्यांनी मुलगी निर्मित्तीला उच्च शिक्षण दिले. सध्या ती जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी इंगोलस्टाड ऑफ अप्लाइड सायन्सेस या विद्यापीठात ग्लाेबल फोरसाईट ॲड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. पंधरा दिवसांपूर्वी तिला ताप आल्याचे निमित्त झाले. यावेळी कोल्हापुरातीलच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या तेजस निवास पाटील (रा. प्रयाग चिखली) या विद्यार्थ्याने तिला तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, लहान मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचा ११ जूनला मृत्यू झाला. याची माहिती सुरेश शिंदे यांना समजताच ते अक्षरश: कोसळले. पत्नीच्या पश्चात मुलीला वाढवताना घेतलेले कष्ट अन् पाहिलेली स्वप्ने एका क्षणात नियतीने धुळीस मिळवल्याने सुरेश शिंदे कोलमडून गेले. जर्मनीहून तिचे पार्थिव पुण्यापर्यंत विमानाने आणले. त्यानंतर कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत रविवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीड महिन्यापूर्वीच गेली होती जर्मनीला

निर्मितीने कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले असून भारती विद्यापीठातून ती संगणक विषयात अभियांत्रिकी पदवीधर झाली. जर्मनी भाषा शिकत तिने नुकतेच फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर २० एप्रिलला ती जर्मनीला शिक्षणासाठी गेली होती.

Web Title: Nirvana Shinde from Kolhapur passed away in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.