मुली घरी परत न आल्यास तांडव करू, नितेश राणेंचा इशारा
By समीर देशपांडे | Published: November 2, 2022 01:37 PM2022-11-02T13:37:25+5:302022-11-02T13:39:48+5:30
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या प्रकरणी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेऊन राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर : कोल्हापूर मधून ज्या मुलींना पळवून नेण्यात आलेले आहे या मुली दोन दिवसात घरी आल्या नाहीत तर कोल्हापूरमध्ये तांडव करू असा स्पष्ट इशारा आमदार नितेश राणे यांनी बुधवारी दिला.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या प्रकरणी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेऊन राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना सूनवताना राणे म्हणाले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत आणि दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री नाही हे लक्षात ठेवा. सरकार बदललेलं आहे. १७ ऑक्टोंबरला तारखेला मुलगी हरवल्याची फिर्याद दिल्यानंतरही तपास होत नाही. वरून फोन केल्यानंतर पोक्सो कलम लावले जाते. अजूनही मुलगी घरी आलेली नाही. तुम्ही काय करता, जमत नसेल तर वर्दी सोडून द्या अशा शब्दात राणे यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले.
त्याआधी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणा देत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चुलीत जावू दे आमदारकी...
हिंदूंवर असा अन्याय होत असेल तर चुलीत जाऊ दे, ती आमदारकी आणि डब्यात जाऊ दे खासदारकी अशा शब्दात यावेळी राणे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना आपला संताप व्यक्त केला