नितीन आला, पण शहीद होऊन!
By Admin | Published: October 30, 2016 12:44 AM2016-10-30T00:44:51+5:302016-10-30T00:49:38+5:30
दुधगाव शोकसागरात : गावात तीन दिवसांचा दुखवटा; आठवडा बाजार रद्द--आॅन दि स्पॉट रिपोर्ट
सचिन लाड -- सांगली --काश्मीरमध्ये कुपवाडा भागात पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन कोळी दिवाळी सणासाठी ५ नोव्हेंबरला गावी येणार होते. चार दिवसांपूर्वी पत्नीला फोनवरून त्यांनी सुटी मंजूर झाल्याचे सांगितले होते. मात्र दिवाळीनंतर सुटीवर येणारे नितीन दिवाळीतच आले; पण शहीद होऊन. त्यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
नितीन कोळी चकमकीत शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या घरी रात्रीच येऊन धडकले होते. कोळी यांच्या घरी फोन आला. ‘मी नितीनचा मित्र बोलतोय, त्याचा भाऊ उल्हास आहे का?’, अशी चौकशी केली. फोन नितीनच्या वडिलांनी उचलला होता. त्यांनी उल्हास बाहेर गेला असल्याचे सांगितले. वडिलांनी शनिवारी सकाळी उल्हासला नितीनच्या मित्राचा फोन आला होता, असे सांगितले. उल्हासने ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्या क्रमांकावर संपर्क साधला, पण फोन उलचला गेला नाही. पुन्हा त्या मित्राचा सकाळी सातला फोन आला. मित्राने घडलेली दु:खद घटना सांगताच उल्हासला जबरदस्त मानसिक धक्का बसला. जिल्हा प्रशासनानेही पोलिस पाटलांच्या माध्यमातून ही बातमी नितीन यांचे वडील व भावाला सांगितली. गावचा सुपुत्र शहीद झाल्याचे वृत्त सकाळी आठला गावकऱ्यांना समजले.
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सकाळी गावात भेट दिली. गावात गेल्यानंतर सुरुवातीलाच कर्मवीर भाऊराव पाटील चौक लागतो. या चौकाशेजारीच कोळी यांचे घर आहे. घराच्या दरवाजाचे गेट लावले होते. शेजारी तीन-चार लोक बसले होते. गावात एखादी अनोळखी व्यक्ती दिसली की, आपण कोण, इकडे कुठे आला आहात, अशी चौकशी सुरू होती. ऐन दिवाळीत गावचा सुपुत्र पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेले दिसत होते. गावात एकही दुकान उघडे नव्हते. नितीन यांची पत्नी व आईला ही बातमी लगेच समजू नये, यासाठी प्रत्येक ग्रामस्थ काळजी घेताना दिसत होता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नितीन यांच्या घराचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही महिला ‘अहो कशाला फोटो घेताय, त्यांच्या घरात अजून काहीच सांगितलं नाही’, असे सांगत होत्या. सीमेवर कर्तव्य बजावत असताना नितीन शहीद झाल्याची चर्चा प्रत्येक चौका-चौकात सुरू होती.
पहाटे दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घरोघरी आकाशदिवे लावले होते. अंगणात रांगोळ्याही काढल्या होत्या. लहान मुले फटाके फोडत होते. मात्र नितीन शहीद झाल्याचे समजताच गावातील प्रमुख लोक एकत्रित आले. त्यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बैठक बोलावली. या बैठकीत नितीन शहीद झाल्याचे सांगण्यात आले. शोकसभा घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ग्रामस्थांनी आकाशदिवे, विजेच्या माळा काढल्या आहेत. नितीनचे वडील व भावाला दु:ख अनावर झाले होते.
नदीकाठी स्वच्छता
नितीन कोळी यांच्या पार्थिवावर गावातच वारणा नदीकाठी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तेथे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामस्थांनी मुरुम टाकण्याचे काम सुरू केले. नदीकाठची स्वच्छता सुरु केली होती. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दुधगावला भेट दिली. शहीद जवान कोळी यांच्याबद्दल ग्रामस्थांकडून माहिती घेतली. कोळी यांच्या पार्थिवावर दुधगावमध्ये नदीकाठी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला आहे.
...तरच भावाच्या आत्म्याला शांती!
नितीन यांचे भाऊ उल्हास म्हणाले, नितीन प्रेमळ स्वभावाचा होता. त्याच्या बोलण्यात नेहमी गोडवा असायचा. सामाजिक कार्यक्रमात तो हिरीरीने सहभागी व्हायचा. पाच-सहा महिन्यांपूर्वी तो गावी आला होता. सध्या कुपवाडा येथे कर्तव्य बजावत होता. मी अजून घरात कुणाला बोललो नाही. माझी एकच इच्छा आहे की, पाकिस्तानला उद्ध्वस्त केले पाहिजे, तर माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल.
पार्थिव
सोमवारी येणार
नितीन यांचे पार्थिव कुपवाडा येथून विमानाने रविवारी दिल्लीत आणण्यात येणार आहे. तेथून पुन्हा विमानाने मुंबईत, त्यानंतर रुग्णवाहिकेतून दुधगाव येथे सोमवारी सकाळपर्यंत आणले जाणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.