बदल्यांच्या टक्केवारीत अडकले नितीन माने
By admin | Published: May 28, 2014 12:56 AM2014-05-28T00:56:13+5:302014-05-28T00:56:51+5:30
जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांचा गौप्यस्फोट : दहा दिवसांत चौकशीअंती कारवाईचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आश्वासन
कोल्हापूर : ग्रामपंचायतींची कामे अन् ग्रामसेवकांच्या बदल्यांच्या टक्केवारीत हात ओले केल्याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नितीन माने कामच करत नाहीत. त्यातून त्यांनी सदस्यांनाही सोडले नसल्याचा गौप्यस्फोट जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह अन्य सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. खोत यांनी या विषयाला तोंड फोडल्यानंतर अन्य सदस्यांनी हा विषय लावून धरत माने यांच्या विभागीय चौकशीची मागणी करत सभागृह रोखून धरले. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे माने यांची भंबेरी उडाली. अखेर येत्या दहा दिवसांत संबंधित आरोपांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने वातावरण थंड झाले. कागलकर हाऊस येथील नवीन कार्यालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नितीन माने यांच्या कारभाराला बाजीराव पाटील यांनी तोंड फोडले. महिन्यापूर्वी दिलेल्या तक्रारीचे काय झाले,अशी विचारणा करत दहा दिवसांत माहिती मिळणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक तुम्ही विलंब केल्याचा आरोप करत नितीन माने यांना उभे करा, मीच प्रश्न विचारतो, असे खोत यांनी विजय सूर्यवंशी यांना सुनावले. ‘जन सुविधा’ योजनेतून सदस्यांकडून किती टक्केवारी घेतली, हुकूमशाहीप्रमाणे अँटी चेंबरमध्ये जाऊन ग्रामसेवकांचे खिसे मोकळे करणारे माने कोण, ३८ हजारांची शवदाहिनी ५४ हजाराला खरेदी केली, स्वत:ची गाडी जिल्हा परिषदेकडे भाड्याने लावून स्वत:च वापरण्याचा ‘प्रताप’ माने यांनी केल्याचा आरोप करत सदस्यांकडून पैसे घेतलेल्या नोटांचे नंबर आपल्याकडे आहेत, ग्रामसेवकांना पुराव्यासाठी सभागृहात आणू का? माने यांचा ‘कलेक्टर’ अजिंक्य गायकवाडला बोलवा, अशी मागणी खोत यांनी मागणी केल्याने सभागृहातील वातावरण धीरगंभीर बनले. सर्वच विभागांत पाणी मुरते, चिंचवडे येथील कामासाठी माने यांनी ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप करत अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामेच करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विलास पाटील (कोपार्डे) यांनी केली. त्यामध्ये हस्तक्षेप करत खोत म्हणाले, निर्मल ग्राम अंतर्गत शौचालय अनुदानाचे धनादेश टक्केवारीसाठी जाणीवपूर्वक माने यांनी रोखून धरले होते. त्यांच्या अनेक कारस्थानाचे आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, अशा भ्रष्ट अधिकार्याला ‘हक्काच्या रजे’वर पाठवण्याची मागणी करत असताना खोत एकेरीवर आले. त्यांना रोखत, सभागृहाच्या परंपरेला गालबोट लागेल, असे शब्द वापरू नका, आरोपांची शहानिशा करावी, अशी सूचना धैर्यशील माने यांनी केली. चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. पन्हाळा तालुक्यातील तीस वर्षांवरील महिलांचे हिमोग्लोबिन तपासणीचा उपक्रम सुरू आहे. ६ हजार महिलांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये १४ टक्के महिलांना मधुमेह झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामासाठी मदतीची गरज आहे, जिल्हा परिषदेने मदत द्यावी, अशी मागणी भाग्यश्री पाटील यांनी केली. कबनूर येथील जलकुंभासाठी प्राथमिक शाळेची जागा द्यावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली. यावर हरकत घेत ही केंद्रशाळा आहे, जलकुंभाबरोबर बौद्ध समाजाने ही जागा मागितल्याचे विजया पाटील यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत स्वत: भेट देऊन त्यानंतर निर्णय घेऊ, असे अध्यक्ष उमेश आपटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)