निवासराव साळोखे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:03+5:302021-09-02T04:51:03+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव श्रीपतराव सोळोखे यांचे सोमवारी मध्यरात्रीनंतर ह्रदयविकाराच्या ...
कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव श्रीपतराव सोळोखे यांचे सोमवारी मध्यरात्रीनंतर ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्युसमई ते ७१ वर्षांचे होते. तात्या या टोपण नावाने निवासराव परिचित होते. त्यांच्या निधनाने कोल्हापूर शहर एक लढाऊ बाणा असलेल्या अभ्यासू कार्यकर्त्यांस मुकला, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
निवासराव साळोखे यांना काही वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास सुरू होता. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. परंतु सोमवारी मध्यरात्री दीड वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
परखड वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, रोखठोक स्वभाव आणि चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार करण्याचा त्यांना बाणा यातून निवासराव साळोखे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. विद्यार्थिदशेत असताना राजाराम महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली. तेथूनच त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मंगळवार पेठेत राष्ट्रीय कॉंग्रेस रुजविण्यासाठी माजी मंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे, माजी महापौर कै. बळीराम पोवार, पी. एस. साळोखे यांच्या बरोबरीने युवक कार्यकर्ता म्हणून त्यांनी वाखाणण्याजोगे काम केले.
पुढे तात्यांनी शहर व जिल्हा राष्ट्रीय काॅंग्रेस व इंटक संघटनांच्या बरोबरीने आपल्या सामाजिक व राजकीय कामात सक्रिय झाले. मंगळवार पेठेतील बालगोपाल तालमीचे ते ३५ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध करत तालिमीची सुसज्ज अशी इमारत बांधली. प्राचीन अशा टेंबलाई मंदिराचा जीर्णोद्धारही त्यांनी केला.
कोल्हापूर शहरातील टोल विरोधी आंदोलन त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आंदोलन ठरले. राज्य सरकार आणि एक मोठ्या ठेकेदाराविरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांना असलेला टोल रद्द करण्यासाठी त्यांना ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही, अशा लोकांच्या सहभागातून आंदोलन उभारले. सलग पाच-सहा वर्षांच्या लढा दिल्यानंतर अखेर सरकारला टोल रद्द करावा लागला. टोल विरोधी आंदोलन राज्यभर गाजले. त्याचे लोण राज्यातही पसरले. त्यामुळे अनेक ठिकाणचा टोल रद्द झाला.
-कॉंग्रेसचे असूनही भाजप मुख्यमंत्र्यांचा सत्कार -
निवासराव मूळचे कॉंग्रेसचे असूनही त्यांनी कॉंग्रेस सरकारच्या विरोधात टोलविरुद्ध आंदोलन केले. हा लढा अखेरपर्यंत त्यांनी सुरू ठेवला. त्यातून त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. भाजप-शिवसेना सरकारने टोल रद्द केल्यानंतर या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात आणून त्यांचा नागरी सत्कार करण्याचा मोठेपणाही निवासराव यांनी दाखविला.
फोटो - ३१०८२०२१०कोल-निवास साळोखे या नावाने पाठविला आहे.