मनपा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना तडिपार करणार

By admin | Published: May 21, 2015 12:41 AM2015-05-21T00:41:27+5:302015-05-21T00:44:37+5:30

एस. चैतन्या यांची माहिती : नूतन अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

Before the NMC elections, the criminals will be detained | मनपा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना तडिपार करणार

मनपा निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांना तडिपार करणार

Next

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काही गुन्हेगार निवडणूक लढविण्यामध्ये सक्रिय असल्याचे समजते. त्यासाठी ते आतापासून आपल्या नावाचा गाजावाजा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पोलीस ठाणे स्तरावर सुरू असून, निवडणूक कालावधीमध्ये एकही गुन्हेगार शहरात व उपनगरांत दिसणार नाही, त्यासाठी त्यांना सळो की पळो करून सोडू, अशी माहिती नूतन अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी पत्रकारांना दिली.
बुधवारी एस. चैतन्या यांनी मावळते अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून बुधवारी पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा उपस्थित होते.
कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्या यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मावळते अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, इचलकरंजी विभागात गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असल्याने कोल्हापूर शहराची चांगली ओळख आहे. आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी काही ‘आर.सी.’ व ‘एस.टी.’ गँगचे गुन्हेगार सक्रिय आहेत. त्यासाठी त्यांना काही राजकीय व गुन्हेगारी टोळ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे समजते.
या गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी सर्व सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाईल, असे चैतन्या यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)


पानसरे हत्येचा छडा लावणारच
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासामध्ये मी सुरुवातीपासून आहे. आता या तपासाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर पडल्याने तो माझ्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तपासासाठी भरपूर प्रयत्न झाले असले तरी आव्हानात्मक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीस
जिल्ह्यात सुरुवातीपासून अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. शहरात कुठे मटका, जुगार, दारूसाठा, आदी अवैध प्रकार दिसून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला नोटीस काढली जाईल. जिल्ह्णातील सर्व अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे.

Web Title: Before the NMC elections, the criminals will be detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.