महापालिकेचे रण तापले
By Admin | Published: August 4, 2015 12:40 AM2015-08-04T00:40:54+5:302015-08-04T00:40:54+5:30
निवडणुकीची धामधूम : पक्षांच्या बैठका, जोडण्यांना वेग
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणाला आता चांगलीच उकळी फुटू लागली असून, भाजप-ताराराणी आघाडीने रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी संघटनेला सोबत घेऊन महायुती करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसची रणनीती निश्चित करण्यासाठी आज, मंगळवारी काँग्रेस कार्यालयात बैठक होत आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे रविवारी मनोमिलन झाल्यानंतर सर्व प्रभागांत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने शिवसेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केली. दरम्यान, शासकीय विश्रामधामवर आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी व जनसुराज्य एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर केले. या सगळ््या राजकीय घडामोडी सुरू असतानाच सायंकाळी ७० प्रभागांचे आरक्षण बदलणार असल्याचे वृत्त येऊन धडकले आणि या निवडणुकीचा नूरच पालटून गेला.
भाजप-ताराराणी आघाडीचा स्वाभिमानी, ‘रिपाइं’साठी गळ
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत भाजप आता ताराराणी आघाडीसोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनाही सोबत घेण्याच्या तयारीत आहे. महायुतीची ही मोट रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने पक्षीय व आघाडी पातळीवर चर्चा सुरू आहे.
ताराराणी आघाडी व भाजपकडून जवळपास ४० हून अधिक ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले असून, पहिली यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात ही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडकवायचाच, या उद्देशाने मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआय (आठवले गट) यांनाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत ताराराणी आघाडी व भाजपच्या नेत्यांची बोलणी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
काँग्रेसकडून चाचपणी सुरू
कोल्हापूर : जनतेशी असणारा थेट संवाद, निवडून येण्याची क्षमता आणि समाजात असणारी स्वच्छ प्रतिमा, अशा निकषावर आधारित काँग्रेस पक्षाकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, आतापर्यंत ५० हून अधिक प्रभागांत उमेदवारांचा शोध पूर्ण झाला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आज, मंगळवारी दुपारी दोन वाजता स्टेशन रोडवरील कॉँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा, तसेच आजी-माजी नगरसेवकांचा मेळावा आयोजित केला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष अन्य कोणाबरोबरही आघाडी करणार नसून, स्वतंत्रपणे लढणार आहे. त्या दृष्टीने पक्षाची हालचाल सुरू झाली आहे. गेले काही दिवस परदेशात असलेले माजी मंत्री सतेज पाटील नुकतेच कोल्हापुरात पोहोचले असून, गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण, अशा दोन विधानसभा मतदारसंघात सतेज पाटील यांनी संपर्क दौराही सुरू केला आहे.
कॉँग्रेसमध्ये सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण सामुदायिकपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आमदार महादेवराव महाडिक यांचा सहभाग कसा आणि कोणत्या-कोणत्या मतदारसंघापुरता राहणार, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु, संपर्कप्रमुख माजी मंत्री पतंगराव कदम हेच याबाबत निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.
माजी मंत्री पाटील यांनी गेल्या दोन दिवसांत ‘दक्षिण’मधील ३६, तर ‘उत्तर’मधील १४ प्रभागांत उमेदवारांची चाचपणी केली आहे. पाटील यांचा दावा ‘दक्षिण’मधील ३६ प्रभाग आणि कसबा बावडा येथील ४ प्रभागांवर असणार आहे. उर्वरित प्रभागांत महादेवराव महाडिक, मालोजीराजे, पी. एन. पाटील यांच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आमदार महाडिक आणि सतेज पाटील यांना कशा प्रकारे पक्ष एकत्र आणणार आहे, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे जागावाटप लवकरच : मुश्रीफ
कोल्हापूर : युती सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या नऊ महिन्यांत कोल्हापूर महापालिकेसाठी एक दमडीही निधी दिला नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्यची आघाडी पक्की असून, लवकरच जागा वाटप निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे आमदार हसन मुश्रीफ व माजी मंत्री विनय कोरे यांच्यात चर्चा झाली. आमदार मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहराचे राजकारण निरपेक्ष व निर्भीडपणे व्हावे, शहराचा विकास व्हावा, यासाठीच आम्ही दोघेजण महापालिका राजकारणात पडलो. केवळ शाहू महाराज यांचे शहर अव्वल व्हावे, या हेतूनेच पाच वर्षे काम केले. गेल्या पाच वर्षांत ८५० कोटी रुपयांचा निधी मिळाला. याउलट शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत एक दमडीचाही निधी महापालिकेला मिळालेला नाही. आघाडीबाबत विनय कोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विजयसिंह जाधव, युवराज पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर उपस्थित होते.
उमेदवार मागणीसाठी इच्छुकांची पक्षाकडे गर्दी होत आहे. परंतु, उमेदवारी देताना उमेदवाराच्या चारित्र्याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. समाजातील डॉक्टर, वकील, उद्योजक अशा बुद्धिजीवी लोकांनी संपर्क साधल्यास त्यांचाही विचार होईल.
- महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप
गेल्या पाच वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराच्या तुलनेत तत्पूर्वीच्या ताराराणी आघाडीचा कारभार चांगला राहिला होता. नेत्यांनी कधीच महापालिकेत हस्तक्षेप केला नव्हता. परंतु, या पाच वर्षांच्या काळात नेत्यांनी प्रत्येक ठरावात लक्ष घालून नगरसेवकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते.
- सुहास लटोरे, निमंत्रक, ताराराणी आघाडी.
पदाची खांडोळी नाही
गत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाची आघाडी असल्याने पदांची वाटणी करावी लागली. त्यामुळे सहा महिन्यांची खांडोळी करावी लागली. कोल्हापूरच्या जनतेने आता राष्ट्रवादी आघाडीला एकहाती सत्ता द्यावी. यामुळे पदांची खांडोळी होणार नाही, असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
काँग्रेससोबत नाहीच
काँग्रेसमधील एक गट आपल्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, तसे काहीही नाही. ते अशक्य आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी देणार
निष्ठावंत कार्यकर्त्यालाच प्राधान्य, असा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना शिवसेनेचा निकष राहणार आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरला आहे.
४जिल्हाप्रमुख संजय पवार व आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे इच्छुकांनी अर्ज द्यायचे आहेत. पारंपरिक मित्र भाजपने ताराराणी आघाडीशी मैत्री केल्यानंतर शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर या निवडणुकीत करणार असल्याचे संपर्कप्रमुखांनी जाहीर केले आहे.
उमेदवारी देताना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख व आमदार यांनी फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार पक्षाचा झेंडा वर्षानुवर्षे खांद्यावर घेऊन पक्ष विस्तार करणाऱ्या निष्ठावंत सैनिकांचा प्राधान्याने विचार होणार आहे. त्याची भागातील ताकद पाहून त्याच्याकडे आर्थिक बळ नसेल तर तेही दिले जाणार आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय केला जाणार नाही.
ज्या प्रभागात शिवसेनेचा सक्षम कार्यकर्ता नसेल, त्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराने पक्षाशी संपर्क साधल्यास त्याचा विचार केला जाईल. इच्छुकांकडून सोमवारपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पद्मा टॉकीज येथील जिल्हा कार्यालय व शनिवार पेठेतील ‘शिवालय’ या शहर कार्यालयात दिवसभर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जासोबत इच्छुकांनी फोटो व बायोडाटा जोडायचा आहे.