महापालिकेची २८ दिवसात अडीच कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:46+5:302021-03-06T04:23:46+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार रुपयांचा घरफाळा तर ९६ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली.
या योजनेद्वारे घरफाळ्यात सवलत दिलेल्या २६ लाख ८६ हजार ६४२ रुपयांच्या विलंब आकारापैकी ११ लाख २९ हजार ७९७ इतक्या विलंब आकाराची सूट देण्यात आली.
दि. १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७ कोटी ३४ लाख ४४ हजार ५२४ इतकी पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार वसूल झाला आहे.
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंअंतर्गत गुरुवारी प्रमिलाराजे रुग्णालयाकडून ७८ लाख ५३ हजार ४६१, बटालियन (आर्मी) विभागाकडून सहा लाख तीन हजार ८७२ व इतर थकबाकीदारांकडून अशी एकूण ९६ लाख ७४ हजार ४८७ इतकी थकबाकी वसूल करण्यात आली. मागील आठ दिवसांमध्ये थकबाकी न भरलेल्यांची एकूण १९ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.
पाणीपुरवठा विभागाच्या वसुली पथकामार्फत १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७५ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून तीन कोटी ८५ लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
वसुलीची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे असून वसुली पथकप्रमुख मोहन जाधव, शांताराम पोवार, पी. एस.माने, अमर बागल, संजय पाटील तसेच सर्व मीटर रिडर्स व फिटर यांनी भाग घेतला.