इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावर प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 12:41 PM2021-12-23T12:41:37+5:302021-12-23T12:42:48+5:30
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर नगरपालिकेच्यावतीने बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर नगरपालिकेच्यावतीने बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतचा कृती आराखडा पूर्ण केला असून त्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता घाटावर दुचाकी, चारचाकी वाहने व कपडे धुता येणार नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
नदीघाटाला संस्थान काळापासूनची परंपरा असून या ठिकाणी अनेक मंदिरे, तसेच इचलकरंजी संस्थानाचे शेवटचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब घोरपडे यांचे स्मारक व अन्य पादुकाही आहेत. त्यामुळे या परिसराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. काही दिवसांपूर्वी घाट परिसरातील वास्तूंची रंगरंगोटी केली आहे. नदीघाट परिसरात धार्मिक विधी केले जात असून सर्व साहित्य घाटावरच तसेच पात्रात टाकले जाते. त्याचबरोबर नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्या व कपडे धुण्यासाठी येतात. घाटाच्या बांधकामाची पडझड होत आहे.
त्यामुळे पालिकेकडून पंचगंगा नदीचे प्रदूषण व नुकसान रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी नदीघाट परिसर बॅरिकेट्स व लाकडी बांबू लावून नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे आता नदीघाट व नदीपात्रात जाता येणार नाही. कोणतेही वाहन जाणार नाही. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.