दिवाळीत फेरीवाल्यांवर कारवाई नको : सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:28 AM2020-10-28T11:28:17+5:302020-10-28T11:30:49+5:30
Muncipal Corporation, Diwali, Kolhapurnews कोरोना आणि लॉकडाऊनने गेल्या सहा महिन्यांपासून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी असून या कालावधीत एकाही फेरीवाल्यावर कारवाई करू नका, अशी मागणी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावीतने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणालाही मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासंदर्भातील बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने गेल्या सहा महिन्यांपासून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी असून या कालावधीत एकाही फेरीवाल्यावर कारवाई करू नका, अशी मागणी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावीतने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणालाही मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासंदर्भातील बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, कोरोनामुळे फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीमध्ये कारवाई करणे योग्य होणार नाही. महाद्वार रोड, पापाची तिकटी येथे महापालिकेने पट्टे मारून द्यावेत. फेरीवाल्यांनी रस्ता अडवून कुठेही बसावे, वाहतुकीची कोंडी करावी, अशी भूमिका नाही.
माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी शिवाजी चौकातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यावरून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, गटनेते अजित ठाणेकर, दिलीप पोवार,रघुनाथ कांबळे उपस्थित होते.
सर्वेसाठी कागदपत्रांची मागणी होत आहे. काहींकडे रेशनकार्ड उपलब्ध नाहीत तर काहींची रेशनकार्ड विभक्त केली नसल्यामुळे अडचणी येत आहेत. आता सर्व्हे झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षे होणार नाही. त्यामुळे कागदपत्रांसाठी कालावधी दिला पाहिजे, अशी सूचना माजी नगरसेवक अशोक भंडारी यांनी केली.
मुदतवाढीला नकार
पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत असल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम युद्धपातळीवर करावे, असे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यानी सांगितले. त्यावर कृती समितीने मुदतवाढीची मागणी केली. सर्व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आयु्क्त डॉ. बलकवडे यांनी म्हटले.