जादा गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई नको
By admin | Published: April 2, 2017 05:34 PM2017-04-02T17:34:31+5:302017-04-02T17:34:31+5:30
चंद्रदीप नरके यांची विधीमंडळात मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी त्यांच्या स्थापित गाळप क्षमतेपेक्षा २० टक्यापर्यंत जादा गाळप केले असेल त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण नियमाखाली कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधीमंडळात केली.
साखर उद्योगावर या निर्बंधामुळे अन्याय होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांवर कारवाई केली आहे. जादा गाळप केल्याबद्दल २५ लाखांची बॅँक हमी घेऊनच पुढील हंगामात गाळप परवाना देण्यात येणार आहे. या कारखान्यांनी क्षमतेपेक्षा २० टक्केच जादा गाळप केले आहे. कारखान्यांवर या यंत्रणेचे पुर्ण नियंत्रण आहे, सर्व यंत्रणा आॅनलाईन असल्याचे आमदार नरके यांनी निदर्शनास आणून दिले. गाळप परवान्याबाबत कोणतेही बंधन असू नये, अथवा कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही नरके यांनी केली.
यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, हा कायदा केंद्र सरकारच्या असल्याने आतापर्यंत नऊ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा २० टक्के जादा गाळप झालेल्या कारखान्यांवर कारवाई करू नये, यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही मंत्री कदम यांनी दिली.