ना बाह्यवळण रस्ता, ना शहरात प्रवेश; कोल्हापुरात अवजड वाहनधारकांची कोंडी

By भारत चव्हाण | Published: January 28, 2023 01:00 PM2023-01-28T13:00:18+5:302023-01-28T13:00:46+5:30

महापालिकेने आखलेले रस्ते अपूर्णच राहिले

No bypass road, no access to the city; Dilemma of heavy vehicles in Kolhapur | ना बाह्यवळण रस्ता, ना शहरात प्रवेश; कोल्हापुरात अवजड वाहनधारकांची कोंडी

संग्रहीत छाया

googlenewsNext

भारत चव्हाण

कोल्हापूर : कोकण, गोवा, मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांना व्यापार, उद्योगाच्या दृष्टीने प्रगतीचा रस्ता खुला करणाऱ्या कोल्हापूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) नसल्याने अवजड तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. अवजड वाहनांना रोज छोट्या-छोट्या गावातून आपला पल्ला गाठावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा खर्च होतोच शिवाय अपघाताचीही भीती अधिक आहे.

कोल्हापूर शहर हे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना कोल्हापूर शहर ओलांडूनच जावे लागते. व्यापार, उद्योगाची वाहतूक येथूनच सुरू होते. त्यामुळे रोज ६०० ते ७०० अवजड वाहने कोल्हापूरच्या सीमा ओलांडून पुढे जात आहेत. बऱ्याच वेळा सांगली, सातारामार्गे कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून व गोव्यातून येणाऱ्या वाहनधारकांना बाह्यवळण रस्ता नसल्यामुळे थेट शहरात येऊन पोहचतात. अशा वेळी एक तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते, तसेच बराच वेळ एकाच जागी ताटकळत थांबावे लागते.

कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने सकाळी दहा ते रात्री आठ अशी शहरात प्रवेश करण्यास अवजड वाहनांना बंद घातली असल्याने रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याशिवाय वाहनधारकांना पर्याय नसतो. शिये-भुयेमार्गे कोकणात जाण्याचा वाहनांना एक पर्याय आहे. शिये-भुयेमार्गे वडणगे, आंबेवाडी रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूक करतानाही चालकांच्या जीवाची घालमेल होते. अन्य मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांनाही अशाच छोट्या-छोट्या रस्त्यांचे पर्याय निवडावे लागतात.

नकाशावर रेघा मारल्या, पुढे काय झाले?

कोल्हापूर शहराभोवतीच्या बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बाह्यवळण रस्त्याचे नकाशे तयार करण्यात आले. त्यांच्याच कारकिर्दीत नंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाले, परंतु या प्राधिकरणाकडून कोणती कार्यवाही झाली, हे आजपर्यंत गुलदस्त्यात राहिले. त्यावर पुढच्या काळात कोणीच लक्ष घातले नाही.

महापालिकेने आखलेले रस्ते अपूर्णच राहिले

महानगरपालिकेने फुलेवाडी ते कळंबा, संभाजीनगर पेट्रोल पंप ते सायबर चौक हे बाह्यवळण रस्ते तयार केले. या रस्त्यांना सलग जोडताना कळंबा जेलची इमारत आडवी आल्याने रस्ता कळंबा ते संभाजीनगर असा वळविण्यात आला. परंतु आता हेच रस्ते शहराच्या मध्यवस्तीत आले आहेत. शिवाय शिवाजी पूल ते कसबा बावडा हा रस्ताही अपूर्णच आहे.

बाह्यवळण रस्त्याची सुविधा नसल्याने शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडला आहे. शिवाय शहरातील रस्तेही लहान आहेत. त्यावरून अवजड तसेच मालवाहतूक करणे शक्य होत नाही. द्वारकानाथ कपूर यांच्या काळात बाह्यवळण रस्त्याची आखणी झाली, काही प्रमाणात अंमलबजावणी झाली. परंतु शहराचा विस्तार झाल्याने आता नवीन बाह्यवळण रस्त्यांची मोठी गरज आहे. -शशिकांत फडतारे, उपसंचालक (निवृत्त) नगररचना पुणे विभाग
 

शहराला लागून बाह्यवळण रस्ते नसल्यामुळे वाहनधारकांची भयंकर अडचणी येत आहे. शहरातून जाता येत नाही आणि थांबायचे म्हटले तर शहराच्या प्रवेशद्वारावर ट्रक टर्मिनल्सही नाहीत. वाहनधारकांना पर्यायी मार्ग शोधावे लागतात. त्यात वेळ जातो, वाहतूक खर्चही वाढतो. - सुभाष जाधव, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असो.

Web Title: No bypass road, no access to the city; Dilemma of heavy vehicles in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.