कागलमधील एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही : मंत्री मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:22 AM2021-01-02T04:22:20+5:302021-01-02T04:22:20+5:30
कागल : पुणे म्हाडाचा प्रकल्प कागल शहरात होण्यास आमचा विरोध नव्हता; पण आपण काहीतरी करून दाखवीत आहोत, म्हणून एका ...
कागल : पुणे म्हाडाचा प्रकल्प कागल शहरात होण्यास आमचा विरोध नव्हता; पण आपण काहीतरी करून दाखवीत आहोत, म्हणून एका रात्रीत नगरपालिकेची ही जागा म्हाडाकडे वर्ग केली. ते चुकीचे होते. कागलच्या जनतेला आधी घरे मिळावीत ही आमची भूमिका कायम आहे. कागल शहरातील एकाही नागरिकाला घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले.
येथील कागल-सांगाव रस्त्यावर गट नंबर ४२५ मध्ये पुणे म्हाडाच्या वतीने ६८४ सदनिका बांधकाम प्रकल्पाची पायाभरणी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, श्रीनाथ समूहाचे चंद्रकात गवळी, शामराव पाटील, पी. बी घाटगे, मुख्याधिकारी पंडित पाटील, प्रवीण काळबर, संजय चितारी, नितीन दिंडे, सुनील माने, सर्व नगरसेवक-नगरसेविका, ‘म्हाडा’चे अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी स्वागत, तर प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले. माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, चंद्रकात गवळी, प्रकाश गाडेकर यांची भाषणे झाली. नितीन दिंडे यांनी आभार मानले.
चौकट
गरिबांच्या घरासाठी मुश्रीफांची तळमळ
प्रवीण काळबर आपल्या भाषणात म्हणाले की, कागल शहरातील एकही नागरिक बेघर राहू नये. त्याला त्याच्या हक्काचा निवारा लाभावा म्हणून मुश्रीफ यांचा नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू असतो. त्यांच्या तळमळीने आज एक हजार घरांचा घरकुल प्रकल्प पूर्ण होत आहे.
नावनोंदणी करण्याचे आवाहन...
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, अत्यल्प उत्पन्न गटातच जास्त म्हणजे ४३२ सदनिका बांधल्या जातील. अनुदान वजा जाता वन बीएचके सदनिकेची किंमत सध्या सात लाख आहे. शासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन त्याची किंमत पाच लाखांपर्यंत खाली आणता येईल. शहरातील इच्छुकांनी तातडीने नावनोंदणी करावी.
फोटो कॅप्शन ०१ कागल म्हाडा प्रोजेक्ट
कागल शहरात म्हाडाच्या गृहप्रकल्पाचा पायाभरणी प्रारंभ शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, चद्रंकात गवळी, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, आदी उपस्थित होते.