नको कोरोना, लॉकडाऊन ... मुकाबला करा मास्क लावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:04+5:302021-02-24T04:25:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी लाट येईल का?, असा भीतीयुक्त प्रश्न उपस्थित झाला आहे. येणारे संकट कितीही मोठे असले तरी, सामूहिक प्रयत्नाद्वारे त्यावर मात करता येऊ शकते, हे मागच्या काही महिन्यात कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. म्हणूनच पुढील काळातही संभाव्य लाटेला परतवून लावण्यासाठी मास्क आणि शारीरिक अंतर राखून मात करण्यासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही.
संपूर्ण जगभर उच्छाद मांडलेल्या कोरोनाच्या विषाणूंनी कोल्हापूकरांवरदेखील अवकृपा केली. डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका अज्ञात विषाणूने येथील जनतेला हैराण करून सोडले होते. एप्रिल २०२० मध्ये पहिली लाट आली, तेव्हा सगळेच अनभिज्ञ होते. काय करायचे, कारोनाचा कसा मुकाबला करायचा, हे ठरवेपर्यंत त्याने कोल्हापूरकरांना आपल्या कवेत घेतले. त्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडली.
पहिल्या थरारक अनुभवाला सामोरे गेल्यामुळे आता आपला शत्रू कोण आणि त्याच्याशी मुकाबला कसा करायचा, हे ज्ञात आहे. त्यामुळे बेफिकीर वागणे सोडून देऊन केवळ मास्क आणि शारीरिक अंतराने ही दुसरी लाट थोपवू शकतो. औषधापेक्षा किती तरी पटीने या दोन छोट्या गोष्टीत सामर्थ्य आहे. त्यामुळे कोरोना, लॉकडाऊन नको असेल, तर या दोन साध्या गोष्टींचा जबाबदारीने वापर केला, तर आपल्या जवळपासही कोरोना येणार नाही. तेव्हा मास्कसारखे शस्त्र छोटे असले तरी कोरोनाला भारी आहे, हे लक्षात असू द्या.
- कोरोनाचे एकूण रुग्ण - ५० हजार २०६
- बरे झालेले एकूण रुग्ण - ४८ हजार ३०९
- कोरोनाचे बळी - १७३७ व्यक्ती
कोरोनाचा धोका वाढतोय.....
कोल्हापूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसात रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. आठ दिवसात कसेबसे ४५ ते ५० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, तेथे आता मागच्या आठवड्यात (दि. १५ ते २२ फेब्रुवारी) १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ७३ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागापेक्षा शहराला धोका जास्त आहे.
प्रतिक्रिया -
१. मागच्या सहा महिन्यात प्रचंड हाल झाले, आता पुन्हा व्हायला नकोत. संसर्ग पुन्हा सुरू झाला तर अर्थचक्र थांबणार आहे. म्हणूनच धोका पत्करायला नको. मास्क हाच उपाय आहे.
- विद्याधर कुलकर्णी, कापूर उत्पादक.
२. संसर्ग रोखण्याकरिता लाॅकडाऊन करणे हा उपाय नाही, तर मास्क व शारीरिक अंतर राखणे हाच खरा उपाय आहे. नागरिकांनी पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे.
- नितीन पोवार, हॉटेल व्यावसायिक.
३. कोरोना गरीब - श्रीमंत भेदभाव करत नाही. कॉकडाऊन काळात गोरगरीब, कष्टकऱ्यांचे हाल होते. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल, तर सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे.
- लाडजी राऊळ, टायपिंग सेंटर चालक.