लॉकडाऊन वाढवण्यावर अद्याप निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:56+5:302021-05-20T04:26:56+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू असून तो वाढवण्याबाबत अद्याप कोणताही विचार किंवा निर्णय झालेला नाही. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू असून तो वाढवण्याबाबत अद्याप कोणताही विचार किंवा निर्णय झालेला नाही. पुढील तीन-चार दिवसात बैठकीद्वारे विचारविनिमय करून यावर अंतिम निर्णय होईल असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवारी स्पष्ट करण्यात आले. हा लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवला जाईल अशी लोकांत चर्चा सुरू झाली असल्याने प्रशासनाने हे स्पष्टीकरण केले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून रोज बाधितांची संख्या हजार व अनेकदा १५०० च्या पुढे जात आहे. रोजच्या मृत्यूचे सरासरी प्रमाण ५० ते ६० इतके आहे. ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १६ ते २३ मे या कालावधीसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असून सध्या केवळ घरपोच दूध व भाजी विक्रीला परवानगी आहे. या लॉकडाऊनची मुदत रविवारनंतर वाढवण्यात येणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दोन दिवसांत लोकप्रतिनिधी व संबंधित घटकांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय न झाल्यास ३१ मेपर्यंत राज्य शासनाच्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ पर्यंत व्यवहार सुरू व त्यानंतर कडक लॉकडाऊन सुरू राहील.
---