ना विकासकामांना मुहूर्त, ना खासदार गावभेटीला

By admin | Published: May 26, 2015 12:13 AM2015-05-26T00:13:04+5:302015-05-26T00:51:10+5:30

!--सोनवडे

No development work, no MP from Gavhatheta | ना विकासकामांना मुहूर्त, ना खासदार गावभेटीला

ना विकासकामांना मुहूर्त, ना खासदार गावभेटीला

Next

प्रवीण देसाई - कोल्हापूर -शासकीय पातळीवर नुसत्याच बैठका होत आहेत. मात्र, प्रत्यक्ष विकासकामांना मुहूर्त लागलेला नाही, अशी स्थिती सोनवडे (ता. शाहूवाडी) या गावची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार संजय राऊत यांनी हे गाव निवडले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या गावात एकदाही फेरी मारलेली नाही. प्रशासकीय पातळीवरील कार्यवाहीची गती संथ असल्याचे चित्र आहे.बांबवडेपासून एक किलोमीटर अंतरावरील सुमारे दोन हजार लोकवस्तीचे हे गाव. गावातील एकूण भौगोलिक क्षेत्र ३८६.२१ हेक्टर आहे. जमिनीचे जिरायत क्षेत्र ३०८.४४ हेक्टर, तर बागायत क्षेत्र १९ हेक्टर इतके आहे. येथे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मिरची ही खरीप पिके, तर रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व ऊस ही उन्हाळी पिके अशी येथील पीकपद्धती आहे. पाण्याची कोणतीही योजना नसल्याने गावातील जवळपास ८० टक्के जमीन कोरडवाहू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजनेसह हातपंपांची सोय करण्यात आली आहे; परंतु सक्षम अशी योजना नसल्याने अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारत जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. रस्त्यांची स्थिती चांगली असली तरी गटारी नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असते. गावात दोन तलाव असून, एकाचा वापर जनावरे आणि धुणी धुण्यासाठी, तर एक तलाव कोरडा पडला आहे. सहा महिन्यांपूर्वी खासदार राऊत यांनी दत्तक घेतलेले गाव आहे तसेच आहे. अद्याप कोणत्याही विकासकामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय पातळीवर बैठका आणि कागदपत्रांमध्येच ही योजना अद्याप असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
एकूण कालावधी पाहता कोणतेही विकासकाम सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत खासदार राऊत यांनी एकदाही या गावाला भेट दिलेली नाही. तीच स्थिती जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची आहे. प्रशासकीय पातळीवर बैठकांवर बैठका होत आहेत. मार्च ते एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नळ पाणीपुरवठा) सुषमा देसाई, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक वाय. डी. हुंदरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. डी. नांद्रेकर, रस्ते विकास प्रकल्पा(प्रधानमंत्री ग्रामसडक योजना)चे कार्यकारी अभियंता ए. पी. नागरगोजे, शाहूवाडीचे कृषी विस्तार अधिकारी अभिजित घोरपडे, विस्तार अधिकारी पी. व्ही. कांबळे यांनी गावात येऊन बैठका घेतल्या आहेत तसेच शाहूवाडीच्या महिला बचतगट समन्वयक मंडळे व विस्तार अधिकारी हणमंते यांनी गावातील महिला बचतगटांचा मेळावा घेतला आहे. बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या बांबवडे शाखेचे महाप्रबंधक प्रवीण कळकुंबे यांनीही बैठक घेऊन माहिती दिली आहे. ग्रामपंचायतीने पाठविलेल्या प्रस्तावांवर प्रशासकीय पातळीवर ग्रामविकास आराखडा तयार केला जात असून, त्यानंतर त्याला मंजुरी मिळण्याची आहे.
गावच्या सुपुत्राचा पुढाकार
गावचे सुपुत्र व मुंबई विद्यापीठातील निरंतर विभागाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने खासदार संजय राऊन यांनी हे गाव दत्तक घेले आहे. विविध माध्यमांतून गावाला मदत करीत त्यांनी आपल्या गावाशी नाळ घट्ट ठेवली आहे.--संजय राऊत



गावासाठी आवश्यक विकासकामांचा आराखडा पूर्ण झाला असून, त्याचा शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांकडून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. - बाजीराव सुतार, सरपंच

सांसद ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी गाव दत्तक घेऊन सहा महिने उलटले तरी अद्याप एखादे तरी काम सुरू व्हायला हवे होते. आता काही दिवसांत पावसाळा सुरू होईल. त्यामुळे आणखी चार महिन्यांत कोणतेही विकासकाम होणार नसल्याने हे वर्ष वाया
जाणार आहे. - ग्रामस्थ

Web Title: No development work, no MP from Gavhatheta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.